Akhilesh Yadav
Akhilesh Yadav Sarkarnama
विश्लेषण

विधानसभा लढणार नाही! अखिलेश यादव यांच्या घोषणेने राजकीय भूकंप

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुढील वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच आज समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी विधानसभा निवडणूक न लढण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे.

अखिलेश यादव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात अनेक मोठ्या घोषणा आज केल्या. त्यातील सर्वांत मोठी घोषणा म्हणजे त्यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अखिलेश यादव हे आझमगडमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. ते पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

राष्ट्रीय लोक दलासोबत (आरएलडी) जागावाटप आघाडी अंतिम झाल्याची घोषणाही अखिलेश यादव यांनी आज केली. लवकरच जागावाटप होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांच्या प्रगतीशील समाजवादी पक्ष लोहिया या पक्षासोबत आघाडी करण्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. याबाबत माझी कोणतीही हरकत नसून, ते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, असेही अखिलेश यादव यांनी म्हणाले.

दरम्यान, उत्तर प्रदेशात फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू झाले आहे. यात अखिलेश यादव यांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या उपस्थितीत बसपचे 6 बंडखोर आमदार आणि भाजपच्या एका आमदाराने समाजवादी पक्षात नुकताच प्रवेश केला. बसपच्या आमदारांमध्ये हरगोविंद भार्गव, हाजी मुज्तबा सिद्दीकी, हकीम लाल बिंदस अस्लम रैनी, सुषमा पटेल आणि अस्लम चौधरी यांचा समावेश आहे. सीतापूरमधील भाजपचे आमदार राकेश राठोड यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला.

राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत बसपच्या 6 आमदारांनी समाजवादी पक्षाला साथ दिली होती. यामुळे त्यांनी बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी निलंबित केले होते. अखेर या आमदारांनी थेट समाजवादी पक्षात प्रवेश करून मायावतींना आव्हान दिले. या आमदारांच्या प्रवेशामुळे अखिलेश यादव यांनी फोडाफोडीच्या राजकारणात आघाडी घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT