Suresh Dhas Sarkarnama
विश्लेषण

Walmik Karad News : ...खरं,खोटं काय ते बावनकुळे, धस अन् मिटकरींनाच ठावं!

Mahayuti Politics : वाल्मिक कराडने चांगले काम केले असेल, असे विधान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यासह कराडच्या विरोधात रान पेटवले आहे. आमदार धस शांत नाही झाले तर आम्हीही त्यांची प्रकरणे बाहेर काढणार, असा इशारा राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी दिला आहे. आहे की नाही गोंधळ? त्यामुळे खरे काय आणि खोटे काय हे या तिघांवरच सोडून द्यायला हवे.

अय्यूब कादरी

Maharashtra News : गेल्या महिन्यात बीड जिल्ह्यात घडलेली हादरवून टाकणारी घटना आणि त्यावरून सुरू असलेले राजकारण डोके चक्रावून टाकणारे आहे. मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील, विशेषतः परळीतील अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून टीका केली जात आहे. काही सत्ताधारी नेते टीका करत असताना काही नेते मात्र संशयित आरोपींची बाजू घेतल्यासारखी विधाने करत आहेत. त्यामुळे संभ्रम वाढत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नुकतेच असे एक विधान केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या पक्षाची बाजू सातत्याने जोरकसपणे मांडली आहे. आपल्या नेत्यांचा, पक्षाचा बचाव करण्यात ते तरबेज आहेत. महायुतीची सत्ता आल्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. महसूलसारखे महत्वाचे खाते त्यांना मिळाले. भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही अद्याप त्यांच्याकडेच आहे.

भाजपचे बावनकुळे हे बाजू जोरकसपणे मांडत असले तरी फिरक्या घेणे आणि उपहासात्मक टीका त्यांनी फारशी केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे त्यांनी नुकतेच केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. ते सरळ बोलले की उपहासाने बोलले, याचा अंदाज लावणे अवघड झाले आहे.

पवनचक्की कंपनीला दोन कोटींची खंडणी मागणे आणि मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यैनंतर वाल्मिक कराड चर्चेत आला आहे. परळीचा माजी नगराध्यक्ष असलेला कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा जणू उजवा हातच आहे. खंडणीप्रकरणी तो सध्या अटकेत आहेत. त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. असे असतानाही त्याला लाडकी बहीण योजना समितीचे परळीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. कराड याने चांगले काम केले असेल म्हणून त्याला या योजनेचे अध्यक्षपद दिले असेल, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

विरोधकांचा विषय निघाला की नाकाने कांदे सोलणारे बावनकुळे इतक्या गंभीर प्रकरणात असे सहजपणे कसे बोलून गेले असतील, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कराड याला लाडकी बहिण समितीचे अध्यक्षपद दिल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बावनकुळे बोलून गेले. विरोधकांनी आरोप केला, तो खरा असला तरी आपली कमकुवत असलेली बाजू सावरून घेण्याचा बावनकुळे यांना मोठा अनुभव आहे. त्यातूनच अनेक गुन्हे दाखल असलेल्या आणि गंभीर गुन्ह्यात अटकेत असलेल्या कराडची त्यांनी पाठराखण केली असावी.

त्यांच्या वक्तव्याला दुसरी बाजूही आहे. असे समजूया की बावनकुळे कराड याच्याबाबत उपसाहाने बोलले असावेत. ते उपहासाने बोलले असतील तर तो टोला मित्रपक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांना आहे, असा त्याचा अर्थ होतो. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आक्रोश निर्माण झालेला असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मंत्री मुंडे यांच्या पाठिशी ठाम उभे आहेत. आरोप सिद्ध झाले तरच त्यांचा राजीनामा घेणार, अशी भूमिका त्यांनी घेतली. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख हत्या प्रकरण, कराड आणि मुंडे प्रकरण जोर लावून महाराष्ट्रासमोर मांडले आहे.

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोघे एकमेकांचे किती निकटवर्तीय आहेत, हे जगजाहीर आहे. पवनचक्की कंपनीला खंडणी मागणे आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. आपल्याच एका सहकारी आमदाराने म्हणजे सुरेश धस यांनी मुंडे, कराड यांच्याविरोधात रान पेटवलेले आहे, हे बावनकुळे यांना माहित नाही, असे म्हणता येणार नाही. सुरेश धस हे वरिष्ठांच्या परवानगीशिवाय असे रान पेटवणार नाहीत, हेही लोकांना एव्हाना कळून चुकलेले आहे. लोकांच्या या समजाला छेद देण्याचा बावनकुळे यांचा प्रयत्न असावा, अशीही शक्यता आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस हे रोज एक नवीन प्रकरण बाहेर काढत आहेत. कोणालाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहे. कराड याने चांगले काम केले असेल म्हणून त्याला लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्षपद देण्यात आले असेल, असे बावनकुळे म्हणत आहेत. भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेला मुंडेचा पक्ष त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुंडे यांची पाठराखण केली आहे. महायुतीला प्रचंड बहुमत दिलेल्या मतदारांना महायुतीने गृहित धरले आहे, असे सांगणारे हे चित्र आहे.

बावनकुळे हे आमदार धस यांच्यावर तर निशाणा साधत नाहीत ना, असाही प्रश्न त्यांच्या विधानामुळे उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी समजावून सांगूनही सुरेश धस ऐकत नसतील तर आम्हालाही त्यांची प्रकरणे बाहेर काढावी लागतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी नुकताच दिला आहे. मिटकरी आता भाजप नेत्यांची प्रकरणे बाहेर काढणार, असा धसका तर बावनकुळे यांनी घेतला नसेल ना? आपण फक्त अंदाज लावून शकतो. खरे, खोटे काय आहे, हे बावनकुळे, धस आणि मिटकरी यांनाच माहित असणार.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT