विश्लेषण

पुणतांबे संपात सरकारची तळी उचलणाऱ्या संदीप गिड्डेंचे नवे आंदोलन! 

सरकारनामा ब्युरो

कऱ्हाड (सातारा) : शेती व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात राष्ट्रीय किसान महासंघाच्या माध्यमातून एक ते 10 जून या कालावधीत देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. गतवर्षी पुणतांबे येथील शेतकरी संप मागे घेताना रात्रीच्या बैठकीत सरकारशी संगनमत करुन शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केल्याचा आरोप असणारे संदीप गिड्डे हे या नव्या आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. 

देशभरातील 110 शेतकरी संघटना एकत्र येऊन राष्ट्रीय किसान महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रात शेतकरी प्रश्‍नांचे अभ्यासक डॉ. बुधाजीराव मुळीक हे आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम पहात आहेत. 

यासंदर्भात माहिती देताना शेतकरी नेते लक्ष्मण वंगे, राष्ट्रीय समन्वयक संदीप गिड्डे व बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला म्हणाले, संपाच्या अनुषंगाने 22 राज्यात बैठकांच्या माध्यमातून तयारी सुरू आहे. राज्यात देखील या संपाच्या नियोजन बैठकांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्यस्थितीत देशातील शेतकऱ्यांसमोर कर्जबाजारीपणा बरोबरच शेतमालाचे पडलेले भाव हे प्रश्‍न गंभीर आहेत. सरकारच्या शेती व शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. 

या संपादरम्यान शेतकऱ्यांनी आपला शेतमाल, दूध व भाजीपाला शहरामध्ये विक्रीस पाठवू नये तसेच शहरातील कोणतीही नवीन वस्तू खरेदी करू नये, असे आवाहन लक्ष्मण वंगे व संदीप गिड्‌डे यांनी केले आहे. देशातील एकूण 128 शहरे निवडली असून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक व नागपूर या शहरांचा समावेश आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT