Shivraj Patil chakurkar Passes Away Sarkarnama
विश्लेषण

Shivraj Patil: राजकीय टीका अन् पाठीमागे विरोध करणे चाकूरकरांना जमलेच नाही..

Shivraj Patil chakurkar Passes Away: नगराध्यक्ष ते राज्यपाल पदापर्यंतचा राजकीय प्रवास पार करत असताना कधी कोणाविषयी राजकीय टीका आपल्या भाषणातून सोडा, खाजगीमध्ये देखील शिवराज पाटील चाकूरकर यांनी केली नाही.

सरकारनामा ब्यूरो

Shivraj Patil chakurkar Passes Away: गेली सहा दशके लातूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले व देशाच्या राजकारणातील निष्कलंक व्यक्तिमत्त्व लातूरचे नगराध्यक्ष ते राज्यपाल असा राजकीय प्रवास करणारे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी आज निधन झाले आहे.

अचानक अशक्तपणा आल्याने चाकूरकर यांची प्रकृती खालावली.चाकूरकर यांच्यावर त्यांचे फॅमिली डॉक्टर चाकूरकर यांच्या देवघर या निवासस्थानीच उपचार करत होते.डॉक्टरांची टीम देखील सोबत होती.5 डिसेंबर पासून शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रकृती आणखीनच खालावली होती,अगदी अन्नपाणी देखील घ्यायला चाकूरकर यांनी नकार दिला होता.अश्या परिस्थितीत अगदी एअर रुग्णवाहिकेने शिवराज पाटील चाकूरकर यांना दिल्लीला हलवण्याची देखील चाचपणी करत अगदी तयारी देखील केली होती.

चाकूरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील यांनी आवश्यक यंत्रणा देखील आणायची तयारी केली होती. मात्र स्थानिक डॉक्टरांनी अशा परिस्थितीमध्ये शिफ्ट करणे योग्य नाही असा सल्ला दिल्याने चाकूरकरांना हलवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता.व अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली असून लातूरच्या राजकारणातील निष्कलंक व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

राजकारणात कुरघोडी करणे,एकमेकांचे पाय ओढणे , पाठ फिरली की विरोधात बोलणे असे प्रकार काही नवीन नाहीत.हे वर्षानुवर्षे चालत आलेले आहे.मात्र नगराध्यक्ष ते राज्यपाल पदापर्यंतचा राजकीय प्रवास पार करत असताना कधी कोणाविषयी राजकीय टीका आपल्या भाषणातून सोडा, खाजगीमध्ये देखील शिवराज पाटील चाकूरकर यांनी केली नाही.

1991 ला नगर परिषद निवडणुकीत चाकूरकरांना विरोध म्हणून विलासराव देशमुख यांनी काँग्रेसच्या विरोधात स्वतः मंत्री असताना उमेदवार देत राजीव मंच या नावाखाली निवडणूक लढली. काँग्रेसचे उमेदवार पाडले.आणि एस. आर. देशमुख यांना नगराध्यक्ष केले. त्याच एस आर देशमुख यांना पुढे करून आजच्या राजीव गांधी चौक येथे बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्याचे निश्चित झालेले असताना रातोरात एस आर देशमुख यांनी त्याठिकाणी राजीव गांधी यांचा पुतळा आणून बसवला आणि मोठा गोंधळ लातुरात झाला. मात्र यात शिवराज पाटील चाकूरकर यांना लिंगायत समाजात बदनाम करण्याचा आणि त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत चाकूरकरांना फटका बसावा असा हेतू होता.

पुढे 2004 ला तर विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी मिळून रूपाताई पाटील निलंगेकर यांना चाकूरकर यांच्या समोर उभा करून पराभव केला हे जगजाहीर होते. अगदी लातूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर पार्कवर झालेल्या कार्यक्रमात शिवराज पाटील चाकूरकर व्यासपीठावर असताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मी आणि विलासराव देशमुख यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना कसे लोकसभा निवडणुकीत पाडले याची जाहीर कबुली दिली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून चाकूरकर यांनी एक शब्द आपल्या भाषणात काढला नाही.किंवा नंतर देखील त्या निवडणुकीचा कोठे उल्लेख देखील चाकूरकरांनी केला नाही.बाकी कोणाच्या विरोधात बोलणे, किंवा लूज टॉक न करणे,अगदी आपल्या विरोधकांविषयी देखील अपशब्द न काढणे हे देखील शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य राहिले.

- राजकीय कारकीर्द -

  • नगराध्यक्ष लातूर - 1 ऑगस्ट 1966 ते 31 मार्च 1970

  • आमदार लातूर - 1972 ते 1980

  • विधानसभा उपाध्यक्ष - 5 जुलै 1977 ते 2 मार्च 1978

  • विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र - 17 मार्च 1978 ते 6 डिसेंबर 1979

  • लोकसभा सदस्य, लातूर - 1980 ते 2004

  • केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री - 1980 ते 1982

  • केंद्रीय वाणिज्य मंत्री - 1982 ते 1983

  • केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री - 1983 ते 1984

  • लोकसभा उपसभापती - 19 मार्च 1990 ते 13 मार्च 1991

  • लोकसभा सभापती - 10 जुलै 1991 ते 22 मे 1996

  • केंद्रीय गृहमंत्री - 22 मे 2004 ते 30 नोव्हेंबर 2008

  • राज्यसभा सदस्य - 5 जुलै 2004 ते 22 जानेवारी 2010

  • पंजाब राज्यपाल - 22 जानेवारी 2010 ते 21 जानेवारी 2015

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT