विश्लेषण

लोक शहाणे आहेत; तेच मेगाभरतीचा निकाल घेतील : शरद पवार

सरकारनामा ब्यूरो

पुणे :आमच्या पक्षातील काही जणांच्या संस्थेची चौकशी सुरु झाली आहे, असं गेलेले अनेक जण सांगतात. सरकारी यंत्रणांचा आयुध म्हणून वापर केला जात आहे. लोक शहाणे आहेत, तेच या मेगाभरतीचा निकाल लावतील, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. ज्या पक्षात आमचे लोक जातात त्या पक्षाच्या नेत्यांना त्यांना तिकीट देण्याचा अधिकार आहे. आमच्यातले अनेकजण पक्ष सोडून जात आहेत. राज्यात त्यांची सत्ता येईल अस काहींना वाटतंय. मी २७ वर्षे विरोधी बाकावर होतो. मला विरोधी पक्षात जास्त समाधान मिळालं. कारण विरोधक म्हणून थेट लोकांपर्यंत पोहचता येतं. १९५७ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा काँग्रेस सत्तेत आली, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

या आठवड्यात कदाचित निवडणुका जाहीर होतील. प्रत्यक्ष मतदानाला २५-३० दिवस राहिले आहेत. काही जागांवर अदलाबदल शक्य आहे. नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर संयुक्त सभांचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असून काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा ५०-५० असा फॉर्म्युला ठरला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्रातील २८८ जागांपैकी प्रत्येकी १२५-१२५ जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी ३८ जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जागावाटपाचं सूत्र ठरलेलं असलं, तरी कोणती जागा कोण लढवणार, कोणते उमेदवार मैदानात उतरणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप आणि डावे पक्ष या मित्रपक्षांपैकी कोणाला किती जागा मिळणार याचा निर्णय लवकरच होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT