विश्लेषण

तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये की मी काय केले? : पवारांचा अमित शहांना टोला

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : भाजपची नेतेमंडळी राष्ट्रवादीवर चहूबाजूंनी हल्ला करत असताना गडबडून गेलेल्या कार्यकर्त्यांना सावरण्याचे काम पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोलापुरात केले. याच शहरात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पवारांवर टीका केली होती. या टिकेला प्रत्युत्तर पवारांनी दिले.

हे उत्तर देताना त्यांनी कोणाचे नाव नाही घेतले पण अमित शहांचा आधीचा इतिहास त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितला. तसेच सोलापूर जिल्ह्यातून सोडून गेलेल्या मंडळींनाही फार महत्त्व दिले नाही. 

" मी काय म्हातारा झालो? अजून लय जणांना घरी पाठवायचेय.  ते कशाच्या जोरावर पाठवायचे? येथे उपस्थित तरुणाईच्या जोरावर पाठवायचयं. मला काही लोकांच्याकडे बघायचयं," असे त्यांनी सांगताच सभागृहात हशा उसळला आणि टाळ्यांचा  कडकडाट झाला. 

श्री. पवार . म्हणाले, '' गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता? गेलेले नेते इतिहासात जमा होणार आहेत. गेलेल्यांची चर्चा बंद करा. येणाऱ्यांची चर्चा करा.  भलत्याच्या दारात जाण्याची सुभेदारी ज्यांनी घेतली त्यांना जनता जागा दाखवेल. विधानसभेनंतर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असेल." 

पवार यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अत्यंत आक्रमक शैलीत टीका केली . ते म्हणाले, "शरद पवार बरवाईट केले म्हणून कधी तुरुंगात गेले नाहीत . तुरुंगात गेलेल्यानी विचारू नये की शरद पवारांनी काय केले?"सोलापूरच्या सभेत अमित शहांनी शरद पवारांनी काय केले, असा सवाल विचारला होता. त्यांच्या या विधानाला शरद पवारांनी सडेतोड प्रत्त्युत्तर सोलापुरातच दिले . 

शरद पवारांनी आपल्या भाषणात किल्लारी भूकंपाचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, "मी  मुख्यमंत्री असताना किल्लारीत  पहाटे भूकंप झाला. मुंबईहून निघून सकाळी सात वाजता  किल्लारीत दाखल झालो होतो. आजचे राज्यकर्ते काय करतात?  आजचे राज्यकर्ते पुराचा दौरा हेलिकॉप्टरने दौरा करतात आणि अर्ध्या तासात गायब होतात.  राज्याच्या प्रमुखाने आपत्तीच्या ठिकाणी मुक्काम करुन राहावे लागते. कारण त्याशिवाय यंत्रणा हालत नाही." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT