पुणे - ``येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांना बहुमत मिळणार नाही. तरीही राष्ट्रपतींनी त्यांना सरकार बनवण्याची संधी दिली तर मोदींचे नवे सरकार अल्पायुषी ठरेल,'' असे भाकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वर्तवले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रपतींनी स्पष्ट बहुमत नसतानाही नरेंद्र मोदी यांना पुन्हा सरकार बनवण्यासाठी पाचारण केले तर काय होईल, असा प्रश्न विचारण्यात आला असता एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना श्री. पवार म्हणाले, ``तसे झाले तर बहुमताअभावी मोदी यांचे सरकार अल्पायुषी ठरेल. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांना एकदा अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. बहुमत नसल्यामुळे त्यांचे सरकार तेरा दिवसांत कोसळले होते. तशीच अवस्था मोदी यांची होईल.''
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे नाव विरोधी पक्षांतर्फे पुढे येत आहे. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळेल काय, असे विचारले असता श्री. पवार म्हणाले, ``श्री. प्रणव मुखर्जी हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी देशाची प्रदीर्घ काळ सेवा केली आहे. पण ते स्वतः या गोष्टीसाठी तयार आहेत का, हे मला माहीत नाही. सीताराम येचुरी यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर मला त्याची कल्पना नाही.''
विरोधकांची एकजूट कितपत टिकेल आणि मायावती भाजपला पाठिंबा देतील काय यावर बोलताना ते म्हणाले, ``मायावती या भक्कमपणे भाजपच्या विरोधात उभ्या आहेत. त्यांचे विषयी असे बोलणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. विरोधकांचा नेता अद्याप ठरला नसला तरी आम्ही एकत्र येऊन 2004 प्रमाणेच सर्वमान्य नेता निवडू.''
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.