Pawar-Sambhajiraje-Raut
Pawar-Sambhajiraje-Raut sarkarnama
विश्लेषण

पवार, राऊत आणि संभाजीराजे दिल्लीत नियमित भेटत होते.... तेव्हाच ठरवले जात होते..

ज्ञानेश सावंत

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कडव्या शिवसैनिकालाच धाडण्याचा इरादा केलेल्या आणि शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरच संभाजीराजेंना (Sambhaji raje) मते देण्याची भूमिका घेतलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अखेर दोन पावले माघार घेतली आहे. ठाकरेंच्या अटी धुडकावणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेना पुरस्कृत करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याचा संभाजीराजेंचा मार्ग मोकळा झाला आहे. (Rajya Sabha election 2022)

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या आग्रहामुळेच ठाकरे या निवडणुकीनिमित्ताने 'बॅकफूट' आल्याचे बोलले जात आहे. शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत, हा राज ठाकरे यांचा आरोप, छत्रपतींच्या वारसाला राष्ट्रवादीकडून योग्य मानसन्मान नाही, अशी सोशल मिडियावर मराठा संघटनांच्या मराठा पेेजेसवर होणारी टीका, शिवसेनेत मराठ्यांना स्थान नाही, अशी होणारी मांडणी या साऱ्या मुद्यांना उत्तर म्हणून संभाजीराजे यांचे नाव अंतिम झाल्याचे सांगण्यात आले. शरद पवार यांनीही मग मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत हे सारे पोहोचवले आणि त्यांनीही मग यास मान्यता दिली.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेला पाठिंबा असल्याचे पवार यांनी शनिवारी जाहीर केल्याने शिवसेनेच्या गोटात उत्साह होता. मात्र, शिवबंधन बांधण्याच्या प्रस्तावावर संभाजीराजे राजी झाले नाहीत. तरीही, त्यांना खासदार करण्याचा राष्ट्रवादीचा 'मूड' न बदल्यानेच शिवसेना अर्थात, ठाकरेंना पवारांपुढे आपली मनसुबे गुंडाळावे लागल्याचे दिसून आले.

गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीत संभाजीराजे हे नियमितपणे शरद पवारांना भेटत होतेच. पण त्यांच्या चर्चांमध्ये शिवसेना नेते संजय राऊत हे देखील सहभागी होत होते. राऊत यांच्याकडे भोजनाला जायचे असेल तर पवार हे संभाजीराजेना आवर्जून घेऊन जात होते. संभाजीराजेंचे निमंत्रण असेल तर पवार हे राऊतांना सोबत घेत होते. या तिघांची तेव्हाच या बाबींवर चर्चा झाली होती. तेव्हाच पवार आणि राऊत यांच्यात या विषयांवर काही भूमिका ठरली होती.

तरीही ठाकरे यांनी शिवसेनेचा खासदार म्हणून राज्यसभेवर जाण्यासाठी राजे तयार होतात का, हे पाहण्यासाठी खडा टाकला होता. मात्र संभाजीराजेंना पाठिंबा असलेल्या मराठा संघटना आक्रमकपणे सेनेवर तुटून पडल्या. प्रियांक चतुर्वेदी यांना राज्यसभेवर पाठवता मग राजेंना पाठवयाला काय हरकत आहे, असा बिनतोड मुद्दा या मराठा संघटनांनी मांडला. त्याला उत्तर देणे अवघड जात होते. त्यामुळे शिवसेनेला बॅकफूटवर यावे लागले. शिवसेनेने पाठिंबा दिला नसता तर भाजप पाठिंबा द्यायला तयार होतीच. त्यातून पुन्हा महाविकास आघाडी सरकारचे नेते छत्रपतींच्या वारसांना किंमत देत नसल्याचे टीका पुढील काळात झाली असती. यातून मार्ग काढण्यासाठी अखेर संभाजीराजेंना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा देण्यास शिवसेना तयार झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT