विश्लेषण

२०१९ च्या निवडणुकीत शरद पवारच देशाचे चित्र पालटवू शकतात : सुशीलकुमार शिंदे

नितीन बारवकर

शिरूर : सोनिया गांधी व राहुल गांधी हेच माझे नेते असले; तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भविष्यातील राजकारणात देशातील विरोधी पक्षांचे नेतृत्व केल्यास आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी येथे व्यक्त केली. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्यास सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशाचे चित्र पालटवू शकतात, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

देशाच्या चोहोबाजूंनी पवार साहेबांच्या नेतृत्वाला पाठिंबा मिळतो आहे ही आनंदाची बाब असून, महाराष्ट्राचा एक मोठा नेता पंतप्रधान झाल्यास कुणाला वाईट वाटेल. मी तर त्यांचा जवळचा व "पर्मनंट' मित्र असल्याने मला तर परमानंदच होईल, असेही श्री. शिंदे यांनी नमूद केले.

ते म्हणाले, "माझा व पवार साहेबांचा पक्ष वेगवेगळा आहे. त्यामुळे आम्ही वेळप्रसंगी एकमेकांवर टीकाटीपण्णी करतो, न पटलेल्या मुद्‌द्‌यांवर भांडतो. पण आमच्यात कधीच मनभेद होत नाही. आम्ही वेगळ्या पक्षांतील असलो; तरी कधी एकमेकाला पाण्यात बघत नाही, वाईट बोलत नाही.'' 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही श्री. शिंदे यांनी टीका केली. ते म्हणाले, "या देशात पंडित नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, मोरारजीभाई देसाई, इंद्रकुमार गुजराल आणि नंतरच्या काळातही जे पंतप्रधान झाले ते काही संकेत पाळत होते. कुठल्याही राज्यात निवडणूक लागली की काही संकेत पाळत पंतप्रधान फारतर दोन सभा घ्यायचे. पण मोदींनी कर्नाटकात 23 सभा घेतल्या. एवढा घाबरून गेलेला पंतप्रधान आम्ही यापूर्वी कधी पाहिला नाही.``

``पंतप्रधान एखाद्या राज्याच्या निवडणुकीत वीस रॅली काढतो, नव्या नेतृत्वावर टीका करतो तेव्हा त्यांच्या बलवान म्हणविल्या जाणाऱ्या नेतृत्वाची कीव करावीशी वाटते. कर्नाटकातील आमचे एक मंत्री एम. बी. पाटील विजापूर जिल्ह्यातील बबलेश्‍वर या छोट्या मतदार संघातून निवडणूक लढवीत होते. मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी या मतदार संघाला टार्गेट केले. तेथे सर्व शक्तीनिशी लक्ष केंद्रित केले, तरीही पाटील तीस हजारांच्या मताधिक्‍याने निवडून आले. चांगले काम करतो म्हणूनच लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. सुज्ञ जनता विचलित न होता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. जिथे लोक समजले ते मोदी - शहांना चांगलेच समजून बसले आहेत,''असा टोला त्यांनी लगावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT