विश्लेषण

खेडमध्ये ठाकरेंना ‘अच्छे दिन’; आढळरावांच्या बंडानंतरही गोरे गटासह बहुतांश पदाधिकाऱ्यांची निष्ठा 'मातोश्री'वर

रूपेश बुट्टे पाटील

आंबेठाण (जि. पुणे) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजकीय धक्का देऊन राज्यात वेगळे अस्तित्व निर्माण केले, त्यामुळे राज्यात जरी शिंदेशाहीला विविध पदाधिकारी जाऊन मिळत असले तरी आजवर राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असणाऱ्या खेड तालुक्यात मात्र त्यांना म्हणावी अशी साथ मिळत नाही. उलट उद्धव ठाकरे गटाला अच्छे दिन आल्याची परिस्थिती आहे. नुकतेच माजी उपसभापती अमोल पवार यांनी शिवसेनेत प्रवेश करून एकप्रकारे यावर शिक्कामोर्तब केले आहे. खासदारकीच्या तीनही वेळी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना भक्कम साथ देणाऱ्या खेड तालुक्यात मात्र त्यांचा तंबू बऱ्यापैकी रिकामाच दिसत आहे. (Shiv Sena officials in the khed with Uddhav Thackeray)

पूर्वी खेड लोकसभा आणि त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदरकीची हॅट्‌ट्रीक केली. कधी काळी तर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच आव्हान देऊन विरोधात उभे राहण्यासाठी ललकारले होते. त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात आढळराव म्हणजेच शिवसेना असेच चित्र तयार झाले होते. काही विरोधी पक्षाचे नेते तर आढळरावांच्या कार्यकर्त्यांना आढळराव सेना म्हणून संबोधित होते.

आढळराव खासदार असताना जिल्ह्याच्या उत्तर भागात शिवसेनेचे मोठे प्राबल्य होते. परंतु बदलत्या राजकीय परिस्थितीत ही सर्व ताकद आढळराव यांच्या पाठीमागे उभी राहणे अपेक्षित असताना ती फारशी उभी राहिलेली दिसत नाही. अनेक पदाधिकाऱ्यांसह बहुतांश कार्यकर्त्यांनी ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचे धोरण ठरविले असल्याचे अद्याप तरी दिसत आहे.

खेड तालुक्यातही शिवाजीराव आढळराव पाटील यांना म्हणावी अशी साथ मिळालेली नाही. जी ताकद खासदार असताना खेड तालुका आढळराव यांना देत होता ती ताकद आता दिसत नाही. आढळराव खासदार असताना खेडमध्ये (स्व.) सुरेश गोरे आमदार होते. या दोघांनी त्यावेळी प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला चांगली टक्कर दिली होती. परंतु खासदारकी गेल्यानंतर आढळराव यांनी तालुक्यात फारसे लक्ष दिले नसल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर माजी आमदार (स्व.) सुरेश गोरे यांच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांच्या अनेक समर्थकांनी ठाकरेंसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा देखील आढळराव यांना मोठा धक्का आहे.

खेड तालुक्यात दोन माजी उपसभापती वगळले तर ताकदवान पदाधिकारी आढळराव यांना आजपर्यंत तरी मिळालेली नाहीत. काँग्रेसचे एकमेव पंचायत समिती सदस्य आणि माजी उपसभापती अमोल पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. जुने निष्ठावंत शिवसेनेचे पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच निष्ठा ठेवली आहे.

आढळराव यांना खासदारकीच्या प्रत्येक निवडणुकीत खेड तालुक्यातून जसा पाठिंबा मिळत होता, तो आता ओसरायला लागल्याचे हे चिन्ह आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे आणि त्यांचे समर्थक आजपर्यंत अलिप्त होते; परंतु आढळराव शिंदे गटाबरोबर गेल्यानंतर हा गट देखील सक्रीय झाला आहे. तालुक्यातील शिवसेनेचे तीनही जिल्हा परिषद सदस्य ठाकरे गटाबरोबर राहिले आहेत. पंचायत समितीच्या मागील काळात ज्या काही नाट्यमय घडामोड घडल्या होत्या, त्यात शिवसेनेचे आठपैकी पाच सदस्य राष्ट्रवादीबरोबर गेले होते. उर्वरित तीन पैकी एक सदस्य आढळराव यांच्या सोबत गेला आहे, तर एक सदस्य गोरे गटाबरोबर कायम आहे. उर्वरित एक महिला सदस्या ज्यांनी उपसभापतिपद भूषविले आहे, त्यांची भूमिका अजून तरी गुलदस्त्यात दिसत आहे.

एकंदरीत मागील जवळपास १८ वर्षांच्या काळात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना खेड तालुक्यातून जो पाठिंबा मिळत होता, तो यावेळी सध्यातरी मिळताना दिसत नाही, हे मात्र सत्य आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT