Shivsena: कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर-मंतरवरील आंदोलन सर्वोच्च बिंदूवर असताना याची देशभरात चर्चा सुरु होती. भाजपच्या अनेक नेत्यांनी यावर टीकात्मक प्रतिक्रिया दिल्या. पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्यापपर्यंत यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. तर दुसरीकडं त्यांच्या पक्षाच्या दोन दिग्गज नेत्यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची त्यांच्या छत्रपती संभाजी नगर येथील घरी जाऊन भेट घेतली. या घडामोडींमुळं दुखावलेल्या भाजपवर शिवसेनेकडून कुरघोड्या केल्या जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पण यामागची कारणं काय असतील जाणून घेऊयात.
कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे भाजपसाठी जिव्हारी लागलेलं आंदोलन आहे. कारण २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेली भाजप १२ वर्षांनंतर अद्यापही सत्तेत आहे. या बारा वर्षांच्या काळात मोदी सरकारच्या काळात अनेक आंदोलनं झाली पण या आंदोलकांच्या मागणीनुसार, कधीही कुठल्याही मंत्र्याचा राजीनामा या सरकारनं घेतलेला नाही. इतकंच नव्हे तर मोदी पंतप्रधान व्हायच्या आधी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हापासून आजतागायत ते शासनानं नेतृत्व करत आहेत. म्हणजे मोदींच्या या २४ वर्षांच्या नेृत्वाच्या काळात त्यांनी आपल्या एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतलेला नाही. पण कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनामुळं भाजपच्या मंत्र्यांचाही राजीनामा होऊ शकतो आणि त्याची सुरुवात ही सीजेपीच्या आंदोलनापासून झाली असा नरेटिव्ह आता सेट झाला आहे किंबहुना इतिहासात याची नोंद होणार आहे. त्यामुळं सीजेपीचं आंदोलन हे भाजपासाठी अत्यंत जिव्हारी लागणार आंदोलन होतं. त्याचं मुळं आता या आंदोलकांच्या प्रवक्त्यांना गुन्हे दाखल न करण्याचं दिलेलं आश्वासनही मोदी सरकार पाळताना दिसत नाही. उलट निवडून निवडून आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
दरम्यान, भाजपवर थेट वार करणाऱ्या सीजेपीच्या आंदोलकांवर आणि याची स्थापना करणाऱ्या अभिजीत दिपके यांच्यासह त्यांचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यावर सडकून टीका केल्या आहेत. आंदोलकांना देशद्रोही म्हणण्यापासून, या आंदोलनामध्ये परदेशी शक्तींचा हात असल्याचा आरोप करण्यापासून, कॉक्रोच हा शब्द या आंदोलनात विडंबन म्हणून आलेला असला तरी जेनझींना जाणीवपूर्वक झुरळ असं संबोधणं, तसंच आपल्या मीमच्या भाषेत बोलणाऱ्या, पोस्टर्स तयार करणाऱ्या तरुणांच्या भाषेवर आक्षेप घेतला गेला, यावरुन त्यांना अत्यंत हीन शब्दांत टीका केली गेली, या जेनझींना अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत यांनी गटार पिढी असल्याचं हिणवलं. इतकंच नव्हे तर जेव्हा या तरुणांच्या आंदोलनामुळं, त्यांनी पोलिसांच्या मारहाणीत हातपाय मोडून घेतल्यानंतर तसंच रक्त सांडवल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला. पण राजीनामा दिलेल्या या शिक्षण मंत्र्यांचं संसदेत भाजपच्या खासदारांनी मोठी कामगिरी करुन आल्याप्रमाणं स्वागत केलं. यातून सीजेपीच्या आंदोलकांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा त्यांचा हेतू असावा, अशा पद्धतीनं भाजपनं या आंदोलनावर टोकदार प्रतिक्रिया दिल्या.
सीजेपीचं आंदोलन दिल्लीत सुरु झालं त्यानंतर अभिजीत दिपकेंनी पुणे, संभाजीनगर, बंगळुरु, जयपूर, लखनऊ इथं आंदोलनं केली. या आंदोलनांची माध्यमांनी पुरेशी दखल घेतली नाही. त्यानंतर जंतर-मंतरवर पर्यावरणावादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २० दिवस उपोषण केलं. हे उपोषण सरकारनं मोडून काढलं आणि त्यानंतर सीजेपीनं २० जुलै रोजी संसद भवनावर मोर्चा काढण्याची घोषणा केली. या मोर्चासाठी मात्र ज्या पद्धतीनं देशभरातील जेनझींनी लाखोंची गर्दी केली. त्यानंतर या आंदोलनाचं आणि तरुणांचं गांभीर्य सर्वच राजकीय पक्षांना कळालं, विरोधकांमधील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तर या आंदोलनाला पाठिंबा द्यायला सुरुवात केलीच पण सत्ताधाऱ्यांमधील नेत्यांनीही टीका का होईना पण यावर प्रतिक्रिया दिल्या. या सर्व घडामोडी घडत असताना एका मराठी मुलानं म्हणजेच अभिजीत दिपकेनं सुरु केलेला हा लढा, तो शिवसेनेचं ताकद असलेल्या छत्रपती संभाजीनगरचा तो मूळचा रहिवासी असतानाही उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र त्याच्यावर काहीही बोलणं टाळलं. एकूणच सीजेपीच्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं नाही. केवळ आंदोलक तरुणांनी योग्य पद्धतीची भाषा वापरावी असं एक छोटसं आवाहन त्यांनी केलं. त्यापलिकडं त्यांनी हे आंदोलन यशस्वी ठरलं तरीही अद्यापर्यंत एकही शब्द उच्चारेला नाही. त्यामुळं सत्तेतला मित्रपक्ष असलेल्या भाजपला बरं वाटावं यासाठी का होईना किंवा आपल्या पक्षाची म्हणजेच शिवसेनेची भूमिका म्हणून का होईना त्यांनी भाष्य करणं टाळलं. त्यामुळं एरव्ही भाजप संकटात असताना लगेचच मोदी-शहांची बाजून घेणाऱ्या एकनाथ शिंदेंनी यावेळी कुठंलही भाष्य न करणं हे चर्चेला निमंत्रण देणारं ठरलं आहे.
दरम्यान, आंदोलन संपल्यानंतर त्याला मिळालेलं यश आणि जगभरात झालेली चर्चा यानंतर जेव्हा सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके आपल्या घरी म्हणजे छत्रपती संभाजी नगर इथं पोहोचले. त्यानंतर त्यांची विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट घेतली. यामध्ये सुरुवातीला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी भेट दिली. अभिजीत दिपकेंची भेट घेत त्यांच्या आई-वडिलांचीही त्यांनी भेट घेतली. यावेळी दिपके यांच्या कुटुंबाशी आपले जुने कौटुंबिक संबंध असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
त्यानंतर शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी देखील अभिजीत दिपकेची घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी आंदोलनासंदर्भात आणि त्यांना झालेल्या त्रासासंदर्भात चर्चा केल्याचं समोर आलं होतं. यानंतर संभाजीनगरमधील जुने शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील अभिजीत दिपके यांची घरी जाऊन भेट घेतली आणि आंदोलनासंदर्भात चर्चा केली. खैरे हे एकनाथ शिंदेंसोबत नाहीत तर ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळं विरोधातील शिवसैनिकाची भेटही दिपकेंसाठी महत्वाची ठरली.
सीजेपीच्या आंदोलनातील एकनाथ शिंदेंचं मौन आणि आंदोलन संपल्यानंतर याच शिंदेंच्या परवानगीनं शिवसेनेच्या नेत्यांनी दिपकेंची घेतलेली भेट या गोष्टी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आल्या आहेत. यामागे शिवसेनेकडून भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे. कारण विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला देशभरातील जेनझी समुहानं पाठिंबा दिलेला असताना आणि त्यांचे कुटुंबिय आणि नातेवाईक अशा सर्वांचा पाठिंबा असणं म्हणजे मोठी जनशक्ती सध्या भाजपच्या विरोधात एकवटली असल्यानं त्यांना नाराज करुन भागणार नाही, म्हणून शिवसेनेनं यावर कुठल्याही प्रकारचं टीकात्मक भाष्य करणं टाळलं आहे. उलट आंदोलन संपल्यानंतर दिपकेंना भेट देऊन आम्ही तुमच्या पाठिशी आहोत हे सांगण्याचाच एकाअर्थी प्रयत्न केल्याचं दिसून येतं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.