विश्लेषण

शिवसेनेवरील दबावतंत्राची मुहूर्तमेढ उल्हासनगरात

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः निवडणूक प्रचारात झालेली चिखलफेक, ताणले गेलेले संबंध अशा परिस्थितीत स्पष्ट बहुमत न मिळाल्याने शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी पर्यायी मार्गाची चाचपणी सुरू केली आहे. या चाचपणीत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आघाडी घेतली असून, विकासाच्या मुद्‌द्‌याखाली साई पक्षाचा पाठिंबा मिळवीत उल्हासनगरमध्ये शिवसेनेशिवाय सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मागील दहा वर्षे सत्तेत सोबत असलेल्या शिवसेनेवर मात करीत भाजपाने केलेली सरशी म्हणजे हे एक दबावतंत्र आहे, का प्रत्यक्षात असेच चित्र पुढील पाच वर्षे राहणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावून कुख्यात गुंड पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानीच्या टीमला भाजपात प्रवेश देण्यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या स्थानिक साई पक्षाचा विनाशर्त पाठिंबा मिळवत चव्हाण यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे उल्हासनगरच्या विकासासाठी सर्वांनी सोबत यावे असे आव्हान आम्ही सर्वांनाच केले होते. मात्र शिवसेनेने त्याला प्रतिसाद न दिल्याने उल्हासनगरच्या विकासासाठी आम्ही हा पर्यायी मार्ग निवडला असल्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. एवढेच नाही तर पुढील पाच वर्षे भाजपचाच महापौर राहील असेही ते म्हणाले. 

जुळलेल्या संख्याबळाच्या जोरावर उल्हासनगर महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपने दावा केला आहे. मात्र बहुमत नसलेल्या इतर ठिकाणी या आकड्यांची गणिते भाजपा कशी मांडणार? शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठीचे हे भाजपाचे पहिले पाऊल आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT