Shivsena Anniversary Sarkarnama
विश्लेषण

Shiv Sena Foundation Day : शिवसेना ठाकरेंचीच! फुटीनंतर कौल उद्धव यांना; एकनाथ शिंदे यांना दिलासा अन् इशारा !

अय्यूब कादरी

Shivsena Anniversary : मराठी माणसाच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले आणि त्यांना राज्यभरात सहानुभूती मिळाली. त्याचे प्रतिबिंब लोकसभा निवडणुकीच्या निकालात उमटले.

पक्षाचे चिन्ह, नाव नसतानाही ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत 9 जागा मिळाल्या. सत्ता, यंत्रणा, पक्ष, चिन्ह असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 7 जागा मिळाल्या. मतदारांनी उद्धव ठाकरे यांची निवड केली असली तरी एकनाथ शिंदे यांनाही पूर्णपणे नाकारलेले नाही.

एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) आणि 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत घरोबा केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यामुळे ठाकरे यांना मोठी सहानुभूती मिळाली. गेल्या पाच वर्षांत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीचे सरकार पडणे आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद जाणे, ही महाराष्ट्राचे राजकारण बदलणारी घटना ठरली. ज्या भाजपने हे सारे घडवून आणले, त्याचे परिणाम त्यांना लोकसभा निवडणुकीत भोगावे लागले आहेत. महाराष्ट्रातील भाजप खासदारांची संख्या आता 'सिंगल डिजिट'मध्ये आली आहे. लोकांना यापेक्षा अधिक उत्सुकता होती ती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे काय होणार याची.

नेत्यांनी शिवसेना सोडून जाण्याचे प्रकार यापूर्वी झाले आहेत. मात्र त्याची तीव्रता कमी होती. नारायण राणे, छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडले ते मोजक्या आमदारांसह. दोन- अडीच वर्षांपूर्वी मात्र उभी फूट पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shainde) हे 40 आमदार आणि बहुतांश खासदार घेऊन बाहेर पडले. त्यासाठी विविध कारणे देण्यात आली, कारणे देण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. दोन्ही गटांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आजही झडत असतात. दोन्ही गट एकत्र येतील का, याबाबत सातत्याने अंदाज वर्तवले जात असले तरी त्यांनी एकमेकांसाठी आपले दरवाजे कायमचे बंद केले आहेत, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. असे असले तरी राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही.

महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक 23 जागा लढवल्या. महायुतीतून जागा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची मात्र दमछाक झाली. जाहीर केलेला एक उमेदवार त्यांना भाजपच्या दबावाला बळी पडून बदलावा लागला. सलग पाचवेळा विजयी झालेल्या भावना गवळी यांची उमेदवारीही याच कारणामुळे त्यांना कापावी लागली. त्यांना 15 जागा मिळाल्या. दरम्यान, या दोन प्रकरणांनंतर मात्र शिंदे सावध झाले आणि भाजपचा प्रचंड विरोध असतानाही त्यांनी नाशिकची जागा सोडली नाही. असे असले तरी ते भाजपसमोर हतबल झाले आहेत, असा संदेश एव्हाना मतदारांत गेला होता.

लोकसभा निवडणूक म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई होती. पक्ष, चिन्ह हिरावले गेले होते. 40 आमदार, बहुतांश खासदारही सोडून गेले होते. तिकडे शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे त्यांची ताकद वाढली होती. आपलीच शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे, हे सिद्ध करण्याचा दबाव उद्धव ठाकरे यांच्यावर होता. शिंदेंच्या तुलनेत यंत्रणा तोकडी असतानाही ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि खरी शिवसेना कुणाची, हे सिद्ध करण्यात त्यांनी यश मिळवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे हल्ले त्यांनी सक्षमपणे परतवून लावले. मतदानाच्या काही दिवस आधी धाराशिव येथे झालेल्या त्यांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला, त्यांचे भाषणही गाजले. मुंबईत त्यांच्या पक्षाने मिळवलेले यश उल्लेखनीय ठरले. अमोल कीर्तिकर यांची जागा थो़डक्यात गेली. त्याबाबतही आता वाद सुरू झाले आहेत. मुंबई ठाकरेंचीच, असा कौल तेथील मतदारांनी दिला आहे. काहीही करून मुंबई महापालिका जिंकायचीच, असा चंग भाजपने बांधला आहे. त्यामुळे मुंबईतील धक्क्याची तीव्रता शिंदे यांच्यापेक्षा भाजपला अधिक जाणवली असणार.

एकनाथ शिंदे यांनी 15 जागा लढवल्या आणि 7 जागा जिंकल्या. स्ट्राइक रेटच्या दृष्टीने पाहिले तर तो ठाकरे यांच्यापेक्षा चांगला आहे, असे म्हणावे लागेल. मात्र शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे पक्षाचे नाव, चिन्ह आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. याशिवाय शिंदे आणि अजितदादा सोबत असूनही महायुतीची मोठी पीछेहाट झाली आहे. याचीही काही जबाबदारी शिंदे यांच्यावर पडली आहे. उलट, तिकडे महाविकास आघाडीच्या यशाचे श्रेय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठ्या प्रमाणात मिळाले आहे.

प्रतिकूल परिस्थितीत लढत देऊन यश मिळवल्यामुळे उद्धव ठाकरे हे प्रमुख विरोधी चेहरा म्हणून समोर आले आहे. महाविकास आघाडीला विधानसभेची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखालीच लढावी लागणार आहे. शिंदे आणि अजितदादांना सोबत घेऊनही भाजपची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यामुळे भाजप विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

शिंदे आणि ठाकरे यांच्याकडे एकवटलेले आमदार, खासदारांचे संख्याबळ, संघटनशक्ती, आर्थिक बाजू या बाबी लक्षात घेतल्या तर शिवसेना उद्धव ठाकरेंचीच असा कौल मतदारांनी दिला आहे. मतदारांनी शिंदे यांचीही निराशा केलेली नाही. शिंदे हे उत्कृष्ट संघटक समजले जातात. कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. याचा त्यांना या निवडणुकीत फायदा झाला. पक्ष, चिन्ह, आमदार नसतानाही उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या यशामुळे शिंदेंच्या आमदारांतही चलबिचल आहे, अशी चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकीपर्यंत आणखी बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक ही ठाकरे आणि शिंदे यांच्यात वर्चस्वाची लढाई ठरणार आहे. या लढाईआधी उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, हे मात्र नक्की.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT