Gajanan Kirtikar  Sarkarnama
विश्लेषण

Gajanan Kirtikar : ना मंत्रिपद, ना मानपान...शिंदे गटात गेलेल्या कीर्तिकरांना 'सावत्र'पणाची उपरती...

Shinde Vs Thackeray Shivsena : गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती.

अय्यूब कादरी

Political News: एकनाथ शिंदे आणि ४० आमदार बाहेर पडल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली. शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांची रीघच लागली होती. अनेक वर्षे सत्तेची विविध पदे उपभोगलेल्यांचाही त्यात समावेश होता. आमदारांपाठोपाठ १३ खासदारही बाहेर पडले. त्यात मंत्रिपद, आमदारकी, खासदारकी उपभोगलेले ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांचाही समावेश होता. ते बाहेर पडले आणि मग केंद्रात त्यांना मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा सुरू झाली.

ती फोल ठरली. कीर्तिकर यांचे पुत्र अमोल यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. कीर्तिकरांनी साथ सोडणे हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का होता. असे असले तरी शिंदे गटात जाऊन कीर्तिकरांचीही इच्छापूर्ती झाली नाही. त्यामुळे शिंदे गटाला भाजपकडून सावत्र वागणूक मिळत असल्याची उपरती त्यांना झाली होती.

कीर्तिकर हे पाऊल उचलतील अशी चर्चा त्यापूर्वी काही दिवसांपासून सुरू होती. ठाकरे आणि शिंदे गटात दिलजमाई व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. दोन्ही गटांत समेट घडण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार, असे त्यांनी अनेकदा सांगितले होते.

विशेष म्हणजे, शंभर दिवस कारागृहात राहिलेले खासदार, प्रवक्ते संजय राऊत जामिनावर बाहेर आल्याच्या दुसरऱ्या दिवशीत कीर्तिकरांनी ठाकरेंची साथ सोडली होती. शिवसेनेने त्यांना चारवेळा आमदार, दोन वेळा खासदारकीची आणि एकदा गृह राज्यमंत्रिपदावर संधी दिली होती.

कीर्तिकर यांनी नोव्हेंबरमध्ये २०२२ शिंदे गटात प्रवेश केला. भाजपकडून शिंदे गटाला सावत्र वागणूक दिली जात असल्याची उपरती त्यांना मे २०२३ मध्ये झाली. महायुतीत सर्वकाही आलबेल नाही, असे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवले होते. असे असले तरी शिवसेना (शिंदे गट) हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या खासदारांचेही काम एनडीएच्या धेरणांनुसारच असेले पाहिजे, असेही त्यांचे म्हणणे होते.

ते म्हणाले होते, आम्ही एनडीएचा घटक पक्ष आहोत. आमचे काम त्या अनुषंगानेच असले पाहिजे. मात्र, आम्हालाही योग्य स्थान मिळायला हवे. मात्र, भाजपच्या खासदारांप्रमाणे आम्हाला महत्त्व दिले जात नाही. त्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटातील १३ खासदारांची बैठक त्यांच्या निवासस्थानी घेतली होती. त्यावेळी कीर्तिकरांनी ही खंत व्यक्त केली होती. याच्या एक दिवस आधीच कीर्तिकर यांनी केलेले अक वक्तव्य चर्चेत आले होते.

भाजप आणि शिवसेनेत लोकसभा निवडणुकीसाठी २०१९ प्रमाणेच जागावाटप होईल, असे ते म्हणाले होते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कीर्तिकरांचे हे वक्तव्य फेटाळून लावत याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे सांगितले होते. शिवसेना एकत्र असताना जेवढ्या जागा मिळाल्या होत्या, तेवढ्याच जागा शिंदे गटाला मिळाव्यात, असे कीर्तिकरांनी अप्रत्यक्षपणे सुचवले होते. मात्र, भाजपने तातडीने ते फेटाळून लावले होते.

शिंदे गटात दाखल झाल्यानंतर केंद्रात मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा कीर्तिकरांना होती. मंत्रिपद तर नाहीच, त्यांना अन्य एखादे पदही मिळाले नाही. त्यामुळे शिंदे गटाला एनडीएमध्ये सावत्र वागणूक मिळत असल्याची उपरती त्यांना सहा महिन्यांतच झाली होती.

कीर्तिकरांप्रमाणेच अन्य काही जणांचाही अपेक्षाभंग झाला आहे. आमदारांच्या बाबतीतही अशीच अवस्था आहे. मंत्रिपदासाठी अनेक आमदार अद्याप वेटिंगवर आहेत. आता अजितदादा पवारही सरकारमध्ये सहभागी झाल्याने अनेकांना मंत्रिपदासाठी कायमचे वेटिंगवर राहावे लागणार आहे.

Edited by : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT