विश्लेषण

निवडणुकीबाबत " महाराष्ट्र नवनिर्माण ' चे सैनिक संभ्रमात

उमेश घोंगडे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार का ? किती जागांवर लढवणार ? राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडी होणार का ? या सर्व बाबतीत नेतृत्वाच्या पातळीवर असलेली स्पष्टता अद्याप कार्यकर्त्यांपर्यंत पोचलेली नाही. त्यामुळे पक्षाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. येत्या आठ दिवसात आचारसंहिता लागू होईल. तरीही पक्षाच्या पातळीवर स्पष्टता दिसत नसल्याने कार्यकर्ता गोंधळलेला आहे. 

"ईव्हीएम'ला विरोध करण्यासाठी निवडणूक न लढविण्याचा विचार सुरवातीला पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलून दाखविला होता. मात्र, त्याला राज्यातील तसेच देशातील इतर पक्षांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी मनसेने ही भूमिका मागे घेतली. गेल्या काही दिवसांपासून पक्ष पातळीवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. मात्र, कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर आघाडीत सहभागी होण्याबाबत संभ्रम कायम आहे. मनसेला आघाडीत घेण्यास राष्ट्रवादी अनुकूल आहे. 

मात्र, कॉंग्रेसचा विरोध असल्याने अद्याप तरी मनसे आघाडीत सहभागी होऊ शकली नाही. या परिस्थिती मनसे स्वतंत्र लढणार का ? लढली तर किती जागांवर उमेदवार उभे करणार ? या बाबत पक्ष नेतृत्वाने कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. या संदर्भात पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील, असे सांगितले. ते म्हणाले,"" आमच्या पक्षाच्या भूमिका स्पष्ट असतात. त्याबाबत संभ्रम असल्याचे कारण नाही. निवडणुकांना सामोरे जाताना पक्षाची भूमिका तसेच निवडणुकीच्या दौऱ्याबाबत स्वत: ठाकरे लवकर सविस्तर माहिती देण्याची शक्‍यता आहे.'' 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली होती. या सभांचा परिणाम मतदानावर होईल, असे वाटले होते. मात्र, अपेक्षित परिणाम झाला नाही. भाजपाला गेल्यावेळीपेक्षा अधिक बहुमत मिळाले. त्यानंतर कोहिनूर मिल प्रकरणात राज ठाकरे यांची सक्त वसुली संचलनालयाकडून चौकशी झाली. ऐन निवडणुकीच्या तयारीच्या काळातील वेळ वाया गेल्याने तयारीसाठी वेळ कमी झाला. मात्र, तरीही येत्या काही दिवसात पक्षाची भूमिका स्पष्ट होईल, असे पक्षाच्या आणखी एका नेत्याने "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT