मृणाल गोरेंसारख्या सत्शील आणि लढाऊ वृत्तीच्या रणरागिणींनी प्रतिनिधित्व केलेला हा मतदारसंघ परंपरेने कॉंग्रेसविरोधी आहे. प्रजा समाजवादी पक्षाचेही आमदार येथे होते. आणीबाणीविरोधी लाटेत १९७८ मध्ये उदयाला आलेल्या जनता पार्टीने येथील कॉंग्रेसला नेस्तनाबूत केले. नंतर १९९० मध्ये शिवसेनेने जनता पार्टीला शह दिला आणि २०१४ च्या मोदी लाटेत भाजपने येथील शिवसेनेचे वर्चस्व संपवले. इतिहासाची ही चक्रे पाहता, गोरेगाव मतदारसंघात प्रजा समाजवादी व जनता पक्ष यांनी ३० वर्षे आणि नंतर शिवसेनेने २५ वर्षे राज्य केले. सध्या या मतदारसंघावर भाजपची पकड आहे.
मागील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही गोरेगाव पश्चिमेत पाचही नगरसेवक भाजपचे निवडून आले. त्यांनी शिवसेनेच्या तीन व कॉंग्रेसच्या दोन विद्यमान नगरसेवकांचा पराभव केला. त्यापूर्वीच कॉंग्रेसचे माजी नगरसेवक आर. आर. पिल्ले यांची कन्या श्रीकला पिल्ले व कॉंग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांचे भाचे समीर देसाईही भाजपमध्ये आले. कामगारनेते शरद राव यांच्या निधनानंतर येथे डाव्या पक्षांचा कोणीही मोठा नेता उरलेला नाही. २०१४ च्या पराभवानंतर शिवसेना नेते सुभाष देसाईही निवृत्तीच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांचीही दुबळी अवस्था झाली आहे. अर्थात, लोकांच्या मनातील शिवसेना पूर्णपणे संपली नसली तरी पक्ष म्हणून ती उतरणीला लागली आहे. अशा स्थितीत येथे सध्या भाजपला मोकळे रान आहे.
एकेकाळी येथील नगरसेविका आणि उपमहापौर अशी पदे भूषवलेल्या भाजपच्या महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर सध्या गोरेगावचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी मतदारसंघात काही कामे केली आहेत. उदा. प्रसूतिगृहाचे काम वेगात पूर्ण होत आले आहे, सिद्धार्थ रुग्णालयाची पुनर्बांधणी मार्गी लागली, उड्डाणपूल झाले. पण, त्यांच्या काळातही गोरेगावमधील मूळ समस्या तशाच कायम आहेत. लिंक रोडपासून ते सिद्धार्थ नगरपर्यंत थोड्याशा पावसात दोन-तीन फूट तुंबणारे पाणी, तिवरांच्या पट्ट्यातील झोपड्यांच्या अतिक्रमणामुळे छोट्या झालेल्या खाड्या, अरुंद स्टेशन रोडमुळे रेल्वेस्थानकाजवळ होणारी वाहतूक कोंडी, फिल्मीस्तानजवळ आक्रसलेला स्वामी विवेकानंद मार्ग हे प्रश्न अद्याप सुटलेच नाहीत. यापूर्वी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी चौकात आणि वाहतूक बेटांमध्ये प्राण्यांचे मोठमोठे पुतळे उभारून सुशोभीकरण केले होते; तर ठाकूर यांनी रस्ते दुभाजकांवर खेळाडूंचे, तसेच सूर्यनमस्कार घालणाऱ्या साधकांचे पुतळे उभारले. मात्र, असा विकास लोकांना अपेक्षित नाही
विद्या ठाकूर यांच्याऐवजी गोरेगावमध्ये दुसरा उमेदवार देण्याचा भाजप श्रेष्ठींचा प्रस्ताव असल्याचीही चर्चा आहे. दुसरीकडे सुभाष देसाई यांच्यासाठीही हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला जाईल, अशीही वदंता आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वीपर्यंत मतदारसंघात कार्यरत असलेले ठाकूर दाम्पत्य आता एकदम शांत झाल्याचे जाणवते आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल यांनीही येथून चाचपणी करून पाहिली होती. अर्थात युती झाली आणि युतीतील कोणत्याही पक्षाने वा उमेदवाराने येथून निवडणूक लढवली तरी त्याला सहज विजय मिळू शकेल, अशी शक्यता आहे. मात्र, युती झाली नाही, तर शिवसेना-भाजपच्या लढतीमुळे निवडणूक थोडीफार रंगतदार होण्याची शक्यता आहे. भाजपतर्फे समीर देसाई, श्रीकला पिल्ले, दिलीप पटेल; शिवसेनेतर्फे सुभाष देसाई, अमोल कीर्तिकर, दीपक सुर्वे आणि कॉंग्रेसतर्फे स्नेहा झगडे, किरण पटेल हे संभाव्य उमेदवार असतील.
अन्यथा भाजपची गत शिवसेनेसारखी
मागील निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराने साडेसहा हजार मते खाल्ल्याने सुभाष देसाई पावणेपाच हजार मतांनी विद्या ठाकूर यांच्याकडून पराभूत झाले. देसाई यांना २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये ११ हजार मते कमी पडली आणि हाच फरक निर्णायक ठरला. लोकांचे मुख्य प्रश्न न सोडवल्याने शिवसेनेची लोकप्रियता ढासळली, हे लक्षात घेऊन भाजपने वाटचाल करायला हवी; अन्यथा काही वर्षांनी त्यांचीही गत शिवसेनेसारखीच होईल हे निश्चित.
२०१४मधील निवडणुकीतील मते
विद्या ठाकूर (भाजप) : ६३ हजार ६२९
सुभाष देसाई (शिवसेना) : 58 हजार 873
गणेश कांबळे (कॉंग्रेस) : १८ हजार ४१४
शशांक राव (राष्ट्रवादी कॉंग्रेस) : नऊ हजार २८७
शरद सावंत (मनसे) : सहा हजार ४२०
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.