पौड (जि पुणे) : मुळशी तालुक्यातील 45 पैकी 27 मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) नवखे सुनील चांदेरे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत (pdcc bank election) आत्माराम कलाटे यांचा पराभव केला. मुळशीच्या सहकारातील गादीच्या सत्तापरिवर्तनाला चांदेरे यांच्या विजयामुळे सुरूवात झाली आहे. कलाटे यांची तब्बल २२ वर्षांची बॅंकेतील इनिंग चांदेरे यांनी आपल्या गुगलीवर संपुष्टात आणली आहे. (Sunil Chandere ended Atmaram Kalate's 22 years power in Pune Bank)
आत्माराम कलाटे हे गेली बावीस वर्षांपासून राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेचे संचालक होते. बॅंकेचे उपाध्यक्षपद म्हणूनही त्यांनी एक वर्ष काम पाहिले आहे. राजाभाऊ हगवणे यांचा गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी पराभव केला होता. कलाटे यांनी विधानसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकून गळ्यात हाती शिवसेनेचा भगवा घेतला होता. शिवसेनेकडून भोर विधानसभेसाठी आपल्या तिकिट मिळेल, अशी त्यांना आशा होती. पण शिवसेनेकडून त्यांना तिकिट मिळाले नाही. अपेक्षाभंग झाल्यामुळे त्यांनी भोरमधून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, कलाटे यांना त्या निवडणूकीत दहा हजार मतांच्या आतच राहावे लागले, त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा होता, हे दिसून आले.
ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहणारे कार्यकर्ते म्हणून सुनील चांदेरे यांची ओळख आहे. मुळशी पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी त्यांची कामगिरी महत्वाची ठरली होती. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद होते. मात्र, त्यांच्याकडे लोकनियुक्त पद नव्हते. त्यामुळे वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी गेली दोन वर्षांपासून विकास सोसायटीच्या प्रतिनिधी निवडीपासून त्यांचा सक्रीय सहभाग होता. आपल्या बाजूचे प्रतिनिधी निवडले जावेत, यासाठी कलाटे यांनीही डावपेच आखले होते. तीन सोसायट्यांचे प्रतिनिधी निवडणूकीच्या शेवटच्या क्षणी बदलले होते.
सुनील चांदेरे यांना अजित पवार यांचा पाठींबा, तर आत्माराम कलाटे यांचा तब्बल २२ वर्षांचा दिर्घ अनुभव यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे आणि त्यांची टिम एकएक मत गोळा करण्यासाठी रात्रंदिवस पळत होती. त्याचदरम्यान राष्ट्रवादीतीलच काही मंडळी मात्र पडद्याआडून कलाटे यांच्यासाठी सूत्रे हलवत होती. या निवडणुकीत मतदाराला आपल्याकडे वळविण्यासाठी साम दाम दंड भेद या नितीचाही वापर केला. गुन्हेगारीची दहशतही दाखविली गेली. मतदारांच्या खिशात नोटांचा पाऊस पडला. त्यांची दररोज या निवडणूकीच्या चर्चेचा रंग बदलत होता. तथापि 45 पैकी 27 मते घेवून चांदेरे यांनी विजयाचा शिक्कामोर्तब केला. आणि कलाटे यांची सहकारातील बावीस वर्षांची परंपरा मोडीत काढली.
जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीतून मुळशीकरांनी जनशक्तीपुढे धनशक्तीचे काहीही चालत नाही, हे दाखवून दिले आहे. पक्षाचे पाठबळ आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्तांच्या धावपळीमुळे हा विजय झाला. सहकारात पक्षाला आणि जनमताला अभिप्रेत असेच काम करणार, असे पुणे जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक सुनील चांदेरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.