BJP  Sarkarnama
विश्लेषण

BJP Politics : सोबत घ्या, वापरा आणि फेकून द्या, भाजपविषयी असं का बोललं जातं?

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

सोबत घ्या, वापरा आणि फेकून द्या, असेच गेल्या दहा वर्षांतील भाजपचे धोरण राहिले आहे आणि हे फक्त त्यांचे मित्रपक्ष बोलत नाहीत तर स्वकीय नेते सुद्धा सांगत आहेत. शिवसेना, अकाली दल, टीडीपी या प्रमुख प्रादेशिक पक्षांसह महादेव जानकर यांचा रासप, बच्चू कडूंचा प्रहार, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना हे एकेकाळचे भाजपचे मित्र पक्ष आज बाजूला फेकले गेले आहेत. तसेच लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा याचबरोबर एकनाथ खडसे यांची अवस्था “हेची फळ मम काय तपाला”, अशी झाली आहे.

अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी असताना त्यांनी आपल्या मित्र पक्षांना फक्त सोबत ठेवले नाही तर त्यांना कायम मान दिला. आज महाराष्ट्रात नव्हे तर पंजाब, बिहारसह छोट्या राज्यांमध्ये भाजप स्थिरावली ती मित्र पक्षांमुळे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा सुकाणू भाजपच्या हाती आलाय तो शिवसेनेमुळे.

पण, आज ते मातोश्रीला विसरले आहेत, अशीच भावना लोकांच्या मनात दिसून येते. याचमुळे भाजप मित्र पक्षांचा वापर करून फेकून देत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. आता तोच आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप छोट्या पक्षांचा वापर करून फेकून देत असल्याचं जानकर म्हणाले आहेत. 'मोठी माणसं आल्यानंतर छोट्या माणसांची गरज राहत नाही, अशी पद्धत भाजपची असल्याचा आरोपही जानकर यांनी केला आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू म्हणाले, जानकर जे काही बोलत आहेत तसा अनुभव मलाही येऊ लागला आहे. एखाद्या पक्षाला सोबत घ्यायचं आणि नंतर ठेचून काढायचं असं राजकारण आहे.

‘आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली? निवडणुका जवळ आल्यावरच भाजपला मित्रपक्षांची आठवण होत’, असं म्हणत माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी भाजपवर गेल्याच महिन्यात चांगलीच टीका केली घटक पक्षाला सन्मान द्या, मुंगीसुद्धा हत्तीचा पराभव करू शकते असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. विशेष म्हणजे सांगलीतील महायुतीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना सदाभाऊ खोत यांची खदखद बाहेर आली होती.

सत्ता मिळाल्यानंतर ती अविरतपणे आणि विरोधकांच्या त्रासाशिवाय कशी पुरेपूर उपभोगता येईल, असा प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रयत्न असतो. मग त्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून साम, दाम, दंड, भेद अशी सर्व अस्त्रे वापरली जातात. यासाठी कोणताही पक्ष अपवाद नाही. कालपर्यंत काँग्रेस आणि अन्य पक्षांनी या मार्गांचा वापर केला. आता भाजपनेही तोच मार्ग स्वीकारलेला दिसतो. मात्र, त्यासाठी लागणारी परिपक्वता भाजपच्या विद्यमान नेतृत्वात आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.

मग ते केंद्रातील असो की राज्यांमधील. भाजपला सत्ता असलेल्या विविध राज्यांमध्ये गृहकलहांचा सामना करावा लागत आहे. त्यातील बहुतांश ठिकाणी कलहांसाठी विरोधी पक्ष नव्हे, तर स्वपक्षीय किंवा मित्रपक्षच कारण आहेत, हे विशेष. जनसामान्यांमधील लोकप्रियता टिकवून ठेवण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान आहे. यामुळे भाजपला लोकसभेत ३००प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य वाटते तितके सोपे वाटत नाही.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बिहार आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये जनता दलाला सोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय महाराष्ट्रात शिंदे शिवसेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घेऊन त्यांना तीनशे जागा पार करू असे वाटत असले, तरी भाजपच्या तोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. फक्त मित्र पक्षांच्या नव्हे तर लोकांच्या मनातील नाराजी कुठवर जातेय यावर भाजपचा पुढचा प्रवास ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT