Akbaruddin Owaisi Sarkarnama
विश्लेषण

Akbaruddin Owaisi : प्रक्षोभक, चिथावणीखोर भाषणांसाठी अकबरुद्दीन ओवेसींना असे मिळते बळ...

Telangana Election Akbaruddin Owaisi Threatens Police Official In Hyderabad : हैदराबादेतील प्रचार सभेत ओवेसींनी पोलिसांविरोधात चिथावणीखोर भाषा वापरली...

अय्यूब कादरी

Telangana Election 2023 : प्रक्षोभक, चिथावणीखोर भाषण करणे ही आता कोण्या एका पक्षाची किंवा नेत्याची मक्तेदारी राहिलेली नाही. सर्वच पक्षांतील नेते अशी भाषणे करून लक्ष वेधून घेत असतात, समाजात दुही पसरवत असतात. एमआयएम पक्षाचे नाव काढले की खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांचा चेहरा लोकांसमोर येतो. ते अभ्यासू मांडणी करतात, विरोधकांची बोलती बंद करतात, अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्याच पक्षात याच्या उलट एक पात्र आहे. ते दुसरे तिसरे कुणी नसून असदुद्दीन यांचे लहान बंधू अकबरुद्दीन ओवेसी. वादग्रस्त, प्रक्षोभक भाषणांसाठी ते ओळखले जातात. त्यांना एवढे बळ कुठून मिळते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

ओवेसींनी पोलिसांना व्यासपीठावरून जाहीरपणे धमकावले

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. अकबरुद्दीन हे चंद्रायणगुट्टा मतदारसंघातून उभे आहेत. त्यांनी प्रचार सभेच्या व्यासपीठावरून पोलिसांना जाहीरपणे धमकावले आहे. प्रचार सभा वेळेत आटोपून घ्या, अशी सूचना पोलिसांनी त्यांना केली. त्यामुळे ओवेसी यांच्या अंगाचा तिळपापड झाला. ते पोलिस अधिकाऱ्याला म्हणाले, निघा इथून, मला रोखणारा माईचा लाल अद्याप जन्माला यायचा आहे. मी लोकांना एक इशारा केला तर तुम्हाला पळून जावे लागेल. पळवायचे का? (लोकांना उद्देशून). मी यापूर्वी शरीरावर चाकूचे वार आणि गोळ्या झेलल्या आहेत. त्यामुळे माझे शरीर कमकुमत झाले आहे, असे समजता का? अजूनही खूप हिंमत आहे, आणखी पाच मिनिटे शिल्लक आहेत, मी बोलणारच...

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जुने हैदराबाद शहर ओवेसींचे प्रभावक्षेत्र

यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारची प्रक्षोभक विधाने केली आहेत. एका आमदाराच्या तोंडून असे शब्द नक्कीच शोभणारे नाहीत. असे बोलण्यामागे काही कारणे आहेत. भाजपचेही असेच एक आमदार आहेत हैदराबादेत. त्यांचे नाव टी. राजा सिंग. राजा सिंग आणि अकबरुद्दीन ओवेसी हे विष ओकण्यासाठीच ओळखले जातात. जुने हैदराबाद शहर हे ओवेसी यांचे प्रभावक्षेत्र. खासदार असदुद्दीन ओवेसी ज्या भागात राहतात, तेथील रस्ते, सार्वजनिक सुविधांची वाईट अवस्था पाहिल्यानंतर लक्षात येईल की या लोकांनी तेथे कोणत्या पद्धतीचे काम केले आहे. जुन्या हैदराबाद शहरातील जवळपास 80 ते 90 टक्के बांधकामे बेकायदेशीर आहेत, असे त्या भागातील जाणकार सांगतात. लोकांना अशा बांधकामांना संरक्षण हवे आहे. एमआयएम आणि ओवेसी असेपर्यंत हे संरक्षण मिळेल, याची कल्पना जुन्या शहरातील नागरिकांना आहे. त्यामुळे सुविधा पुरवल्या काय आणि न पुरवल्या काय, या भागातील नागरिक त्याबाबत ब्र उच्चारत नाहीत. याचा गैरफायदा घेत ओवेसी अशी विधाने करत असतात. ते आणि टी. राजा सिंग एकमेकांना पूरक विधाने करून आपला खुंटा बळकट राहील, याची काळजी घेत असतात.

तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांवर निवडणूक होत आहे. यापैकी ओवेसी यांचा एमआयएम पक्ष किती जागांवर निवडणूक लढवत असेल? उत्तर आहे, फक्त नऊ. यापैकी सात जागा जुन्या हैदराबाद शहरातील आहेत, या भागात एमआयएमचा प्रभाव आहे. त्यांच्या या निर्णयाचा फायदा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस या पक्षाला होणार आहे. सतत भाजपवर टीका करणारे खासदार अकबरुद्दीन औवेसी येथे मात्र काँग्रेसवर टीका करत असतात. अन्य राज्यांच्या विभानसभा निवडणुकीत अनेक जागांवर उमेदवार उभे करणारे ओवेसी आपल्या गृहराज्यात इतक्या कमी जागांवर का लढत आहेत, ओवेसी यांच्याबद्दल अन्य राज्यांमध्ये काय बोलले जाते, ते कुणाला पूरक ठरेल असे काम करतात, याची माहिती जुन्या हैदराबाद शहरातील लोकांनाही आहे. मात्र, त्याच्याशी त्यांना काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त संरक्षण हवे आहे. अकबरुद्दीन ओवेसी इतके प्रक्षोभक कसे बोलतात, कुणाच्या बळावर बोलतात, याचे उत्तर आता सर्वांना मिळाले असेल.

एमआयएम भाजपची बी टीम?

खासदार ओवेसी हे सतत भाजपवर टीका करतात, संसदेत आणि संसदेच्या बाहेरही. पंतप्रधान मोदी आणि भाजपवर ते शेलक्या शब्दांत टीका करतात. हिंदू आणि मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होईल, असा त्यांचा प्रयत्न असतो. अशा ध्रुवीकरणाचा फायदा नक्कीच भाजपला होत असतो. निवडणुकांमध्ये मात्र त्यांची भाषा बदलते आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या रडारवर येतो. त्यामुळेच एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, अशी टीका काँग्रेसकडून सातत्याने केली जाते. ओवेसी यांचे साम्राज्य मोठे आहे. गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून जुन्या हैदराबात शहराचे ते अनभिषिक्त सम्राट बनून राहिले आहेत. असे असतानाही ईडीने ओवेसी यांच्याकडे आतापर्यंत ढुंकूनही पाहिलेले नाही. यातूनच असे बळ त्यांना मिळत असते. दिलेला टास्क पूर्ण करत राहिले की असे बळ, संरक्षण मिळत राहते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT