Mahayuti's Leader Sarkarnama
विश्लेषण

Mahayuti Alliance Tension : चैत्यभूमीवरील भाषणावरून महायुतीमध्ये नाराजी? शिंदे, अजितदादांना भाषणाची संधीच नाही

Chaityabhoomi Speech Controversy : महायुतीत सातत्याने विविध मुद्द्यांवर मतभेद असल्याचे पाहायला मिळत असून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

सरकारनामा ब्युरो

Mumbai Political News : महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून सुरु असलेले नाराजीनाट्य कमी होण्याचे नाव घेत नाही. एक वाद मिटला नाही तर लगेच दुसऱ्याविषयावरून नाराजी दिसून येते.

या कार्यक्रमात भाषण करणाऱ्याच्या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव होते. मात्र, कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यपाल यांना भाषणाची संधी देण्यात आली.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. चार दिवसापूर्वीच रायगडावरील कार्यक्रमप्रसंगी एकनाथ शिंदेंचे नाव वगळले होते.

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून ऐनवेळी त्यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, चार दिवसातच परत एकदा असा प्रकार घडल्याने महायुतीमधील घटक पक्षात अस्वस्थता दिसून येत आहे.

महायुतीमधील भाजप (BJP), शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तीनही पक्षात समन्वयाचा अभावही मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन चार महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे.

नेहमीच या ना त्या कारणावरून मतभेद दिसत आहेत. सरकार स्थापन झाल्यापासूनच शिंदे गटाच्या आमदारात नाराजीचा सूर दिसून येतो. विशेषतः निधीवाटपाच्या मुद्द्यावरून व शिंदे गटाला मानाचे पान दिले नसल्याने अंतर्गत नाराजी वाढत आहे.

नाराजीनाट्याची ही एक घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी एक घटना घडली. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुती सरकारमधील विविध मंत्री आणि नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंचावर आले.

यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यानंतर राज्यपाल राधाकृष्णन यांनी भाषण केले. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांची भाषणे होतील, असा उल्लेख होता. त्यासाठी वेळदेखील ठरली होती.

कार्यक्रम पत्रिकेनुसार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणासाठी प्रत्येकी ५ मिनिटे देण्यात आली होती. परंतु, दोन्ही नेत्यांना यावेळी भाषणातून वगळण्यात आल्याचे पाहायला मिळाले. भाषणासाठी आपले नाव घेण्यात न आल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारल्याचे समजते.

महायुतीत सातत्याने विविध मुद्द्यांवर मतभेद असल्याचे पाहायला मिळत असून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणाऱ्या अर्थखात्याबाबत तक्रार केल्याचे समजते.

अर्थखात्याकडून शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांच्या फायली वेळेवर मंजूर होत नसल्याची तक्रार शिंदे यांनी शहा यांच्याकडे केल्याचे कळते. तर, यापुढे तसे होणार नाही, असे शहा यांनी शिंदे यांना आश्वस्त केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीमधील एका वादावर पडदा टाकला जात असताना आता दुसऱ्या घटनेवरून वाद रंगण्याची शक्यता आहे.

यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले काही निर्णय किंवा मंजूर केलेल्या योजना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाने स्थगित केल्या आहेत. यामुळे शिंदे गटात नाराजी आहे. आमच्या निर्णयांना मान्यता दिली जात नाही, अशी भावना निर्माण झाली आहे.

अनेक शिंदे गटाचे आमदार ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपलिका यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीबाबतही नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांच्या मते, त्यांच्या भागात विकासकामं थांबली आहेत आणि निधी वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी देखील केल्या आहेत. त्यामुळे महायुतीमधील नाराजीत भरच पडत असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT