supreme court sarkarnama
विश्लेषण

भाजपच्या 12 निलंबित आमदारांचा हुरूप न्यायमूर्तीच्या त्या एका वाक्याने वाढलाय...

महाराष्ट्र विधानसभेत गोंधळ घातल्याबद्दल भाजपच्या (BJP) 12 आमदारांना निलंबित केले होते.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) निलंबित आमदारांना सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज (ता.11 जानेवारी) झालेल्या युक्तिवादात न्यायालयाने या कारवाईवरुन महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले.

या वेळी न्यायालयाने भाजपच्या 12 निलंबित आमदारांवरील कारवाई बरखास्तीपेक्षाही जास्त कडक ठरत असल्याचे मत व्यक्त केले. 5 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र विधानसभेने ठराव करत गोंधळ घातल्याबद्दल भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केले होते. त्यानंतर विधानसभेचे हिवाळी अधिवेशनही पार पडले. मात्र, त्यातही हे निलंबन मागे घेण्यात आले नाही.

या संदर्भात पुढची सुनावणी मंगळवारी (ता. 18 जानेवारी) होणार आहे. मात्र न्यायालयाचा आजचा रोख पहाता भाजपच्या 12 निलंबित आमदारांना लवकरच दिलासा मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायमूर्ती अजय खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या पीठासमोर आज ही सुनावणी झाली. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी सरकारच्या प्रतिसादासाठी वाढीव वेळ मागून घेतला आहे.

युक्तिवादा दरम्यान न्यायालयाने या कारवाईवर ताशेरे ओढले. आमदारांचे निलंबन हा विधिमंडळ सभागृहाचा निर्णय असला तरी 60 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी ते करता येणार नाही, असेही न्यायालयाने यावेळी बजावले. अशा प्रकारे आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईत न्यायालये सहसा हस्तक्षेप करीत नाही, असेही सांगितले. कारण हा कार्यपालिकेचा (सभागृहाचा) अधिकार असतो असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वकिलांनी केला. त्यावर या निलंबन कारवाईत केवळ आमदारांनाच नव्हे तर घटनात्मक मूल्यांनाही शिक्षा होत आहे त्याचे काय, असे मत नोंदवून न्यायालयाने कडक टिप्पणी केली.

दरम्यान, आज न्यायालयाने राज्य सरकारला 12 आमदारांच्या निलंबनावरुन फटकारले. या पार्श्वभूमीवर निलंबित 12 आमदांरापैकी आमदार संजय कुटेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आम्ही जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडत असतांना आमच्यावर षडयंत्र करून निलंबनाची कारवाई करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारकडून आम्हालाच नाही तर जनतेला सुद्धा अपेक्षा नाही. या सरकारकडून आवाज दाबला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, आमच्यावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी आम्हाला विधिमंडळाकडून अपेक्षा नाही. मात्र, आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास कुटे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT