thirteen year old vaccinated in madhya pradesh according to government documents
thirteen year old vaccinated in madhya pradesh according to government documents  
विश्लेषण

लसीकरणाचा सावळागोंधळ..13 वर्षांच्या मुलालाही कोरोना लस देण्याचा विक्रम!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सरकारने कोरोना लसीकरण (Covid Vaccination) मोहिमेला गती दिली असून, दररोज विक्रमी लसीकरण होत आहे. आता या विक्रमी आकड्यांतील सावळागोंधळ समोर येऊ लागला आहे. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एका 13 वर्षांच्या मुलाला कोरोना लस (Covid vaccine) दिल्याची सरकारी नोंद झाली असून, यामुळे एकूणच लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. 

मध्य प्रदेशने 21 जूनला 17.42 लाख जणांना कोरोना लस देऊन राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. आता राज्यातील अनेक जण लसीकरण न होताही लस मिळाल्याच्या मेसेज आल्याची तक्रार करु लागले आहेत. अनेकांना लस न घेताही ती घेतल्याचा मेसेज येत आहे. यातच 13 वर्षांच्या मुलाच्या कोरोना लसीकरणाचा प्रकार समोर आला असून, लसीकरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 
 
भोपाळमधील रणजित डांगरे यांच्या मोबाईलवर काल (ता.28) सायंकाळी एक मेसेज आला. त्यांचा 13 वर्षांचा दिव्यांग मुलगा रजत डांगरे याला कोरोना लस देण्यात आली आहे, असा हा मेसेज होता. हा मेसेज पाहून डांगरे यांना धक्काच बसला. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, मला काल मोबाईलवर माझ्या मुलाचे कोरोना लसीकरण झाल्याचा मेसेज आला. मी त्यातील लिंकवर जाऊन लसीकरण प्रमाणपत्रही डाऊनलोड केले. त्यात त्यांनी वापरलेली कागदपत्रे मी काही दिवसांपूर्वी महापालिकेकडे मुलाच्या पेन्शनसाठी दिलेली होती. 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT