काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) सत्ता स्थापन केली असून, हजारो नागरिक देश सोडून पलायन करू लागले आहेत. काबूलच्या (Kabul) विमानतळावर हजारो जणांनी विमान पकडण्यासाठी गर्दी केला आहे. विमानात बसण्यासाठी लोकांमध्ये धक्काबुक्की आणि भांडणे सुरू आहेत.
काबूल विमानतळावर उभ्या असलेल्या विमानात बसण्यासाठी गर्दी केलेल्या प्रवाशांचा व्हिडीओ समोर आला आहे. विमानात बसण्यासाठी लोक धक्काबुक्की करीत आहेत. त्याचबरोबर विमानाला लोंबकळत असल्याचे दिसत आहे. अनेक जण विमानाच्या जिन्याला लोंबकळून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते. एखाद्या गर्दीच्या बसस्थानकासारखी काबूल विमानतळाची अवस्था झाली आहे. लोकांचे लोंढे विमानतळावर येत आहेत. परंतु, देश सोडून बाहेर जाण्यासाठी विमानात बसण्यास अनेकांना जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. अफगाणिस्तानमध्ये शिल्लक असलेले अमेरिकी सैनिक विमानतळाची सुरक्षा करीत आहेत.
तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळाले आहेत. ते ताजिकिस्तानमध्ये आश्रयास गेले आहेत. तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो.
तालिबानच्या दहशतीसमोर अफगाणिस्तान सरकार अखेर झुकले आहे. तालिबान्यांनी रविवारी (ता.15) सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले आहेत. सर्वबाजूने काबूलला घेरण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अशरफ घनी यांनी देश सोडला.
घनी हे त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिद आणि दुसऱ्या निकटवर्ती सहकाऱ्यासह देश सोडून गेले आहेत. दिवसभर घडलेल्या घडामोडींनंतर तालिबानने अध्यक्षीय भवनही ताब्यात घेतले होते. त्यामुळे आता संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या अधिपत्याखाली आलंेआहे. मागील सुमारे 100 दिवसांपासून तालिबानने अफगाणिस्तानला जेरीस आणले होते. एक-एक राज्य काबीज करत त्यांनी अखेर रविवारी संपूर्ण देशावर कब्जा केला आहे.
दरम्यान, मुल्ला अब्दुल गनी बरादर हा मुल्ला उमर यांचा सर्वात विश्वासू कमांडर असल्याचं सांगितलं जात आहे. ते तालिबान सरकारचे सध्याचे अध्यक्ष आहेत. अफगाणिस्तानमध्ये 1994 मध्ये तालिबान आंदोलन सुरू करणाऱ्या चार जणांपैकी मुल्ला बरादर हे एक आहेत. त्याला 2010 मध्ये कराची येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये पाकिस्तानने त्याची सुटका केली.
तालिबानने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालिबानच्या सैन्याला काबूलच्या सीमांवरच थांबायला सांगितले आहे. आम्ही सामान्य लोक किंवा सैन्याविरोधात बदल्याच्या भावनेतून कोणतीही कारवाई किंवा हल्ला करणार नाही. तालिबान अशा सर्वांना माफ करत आहे. तसेच सगळ्यांनी घरीच राहावे, देश सोडण्याचा प्रयत्न करू नये, अशी धमकीही देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.