Rashmi Shukla, Mahavikas Aghadi Sarkarnama
विश्लेषण

Rashmi Shukla : विरोधकांच्या नैतिक दबावाचा विजय अन् फडणवीस, महायुती सरकारची नाचक्की

Transfer of Director General of Police Rashmi Shukla : आयोगाला अखेर रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालक पदावरून उचलबांगडी करावी लागली आहे.

अय्यूब कादरी

Mumbai News: राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या भाजपसाठी काम करतात, अशा आशयाचे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने केले जात होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आरोपांची धार वाढली होती. रश्मी शुक्लांच्या बदलीवरून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हेही निरुत्तर झाले होते.

विरोधकांनी निवडणूक आयोगावर निर्माण केलेल्या नैतिक दबावाचा हा परिणाम होता. त्यातूनच आयोगाला अखेर रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालक पदावरून उचलबांगडी करावी लागली आहे.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन होत असतानाच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर झाला होता. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांनी नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहरात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांची राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. त्यांना पुण्याचे पोलिस आय़ुक्तपदही मिळाले होते. त्यामुळे त्या फडणवीस यांच्या निकटवर्तीय आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. शुक्ला यांची उचलबांगडी झाल्यामुळे विरोधकांचा नैतिक विजय झाला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारची नाचक्की झाली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यांच्या दोन-तीन महिन्यांनंतरच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केले जात आहेत, असे ते म्हणाले होते. त्याच काळात पेगासस स्पायवेअरच्या चर्चेने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मोबाईलमध्ये हा स्पायवेअर घुसवून त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप झाला होता. तसाच आरोप महाराष्ट्रातही झाला होता. या स्पायवेअरद्वारे सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी आणि नेत्यांवरही पाळत ठेवण्यात आली होती, असा विरोधकांचा दावा होता.

फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती. समितीच्या अहवालानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्याच्या बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर या प्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट मिळाली होती.

क्लीन चिट मिळाली तरी विरोधकांनी फोन टॅपिंगचा मुद्दा लावून धरला होता, रश्मी शुक्ला यांना घेरण्याचे काम सुरूच ठेवले होते. महायुतीचे सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी (Police) नियुक्ती करण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) कार्यक्रम जाहीर करण्यासाठी मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर राजीव कुमार हे निरुत्तर झाले होते. रश्मी शुक्ला यांची बदली करावी, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रश्मी शुक्ला यांचा मुद्दा विरोधकांकडून उचलला जाण्याची शक्यता होती. फडणवीस हेच त्यांना पाठीशी घालत आहेत, रश्मी शु्क्ला या पोलिस महासंचालक पदावर असल्यामुळे निवडणूक प्रकिया पारदर्शक होणार नाही, असे नॅरेटिव्ह सेट करण्याची आयतीच संधी महाविकास आघाडीला मिळाली होती.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुंबईतील 15 पोलिस अधिकाऱ्यांसह राज्यातील 28 पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. तिनशेपेक्षा अधिक पोलिस निरीक्षकांचीही बदली करण्यात आली. मात्र विरोधी पक्षांनी मागणी करूनही पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी टाळाटाळ केली जात होती.

अखेर निवडणूक आयोगाने त्याची दखल घेत त्यांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्ला यांना पदावरून हटवल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. शुक्ला या भाजपसाठी काम करतात, असा आरोप पटोले यांनी यापूर्वी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT