Fadnavis-Thackeray and Eknath Shinde Sarkarnama
विश्लेषण

Fadnavis-Thackeray and Eknath Shinde: ठाकरे अन् CM फडणवीसांची वाढती जवळीक; शिंदे - राज ठाकरेंसाठी धोक्याची घंटा..?

Uddhav Thackeray Meet Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीक वाढत आहे. आधी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तीन वेळा फडणवीस यांची भेट घेतली आहे. ही जवळीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची डोकेदुखी वाढवणारी ठरणार आहे.

अय्यूब कादरी

Devendra Fadanavis and Uddhav Thackeray Politics विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि विरोधी गोटात म्हणजे महाविकास आघाडीत शांतता पसरली. विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहावे लागेल, असा नॅरेटिव्ह गेल्या पाच वर्षांत तयार झालाच आहे. लोकांनाही तो पटला आहे, हे विधानसभा निकालाने दाखवून दिले आहे. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, या सूत्राला सरसकट आपल्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी वापरण्याची पद्धत गेल्या पाच वर्षांत रूढ झाली आहे. नवीन वर्षातही ती कायम राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

प्रचंड बहुमत मिळवून सत्तेत आलेल्या महायुतीतील पक्षांमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे म्हणता येणार नाही. मुख्यमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचे रुसवे-फुगवे महाराष्ट्राने पाहिले आहेत. एकमेकांना पाण्यात पाहणारे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही महाराष्ट्रने पाहिली आहे. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांनी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची तीन वेळा भेट घेतली आहे. महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तिकडे दिल्लीत काँग्रेस ऐवजी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.

...या घटनांना योगायोग कसे म्हणता येईल? -

उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री फडणवीस(Devendra Fadnavis) यांची भेट, आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांची तीनवेळा भेट, दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसऐवजी आपला पाठिंबा, या घटनांना योगायोग कसे म्हणता येईल? गेल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांचा राग फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांच्यावर अधिक असल्याचे दिसून आले आहे. ठाकरेंची फडणवीस यांच्यासोबतची जवळीक सर्वाधिक त्रासदायक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवडीवेळी अजित पवारांनी आपले वजन फडणवीस यांच्या पारड्यात टाकून शिंदेंची आधीच अडचण करून ठेवलेली आहे.

...अशा भक्कम अवस्थेत भाजप -

सत्तेत असले तरी एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष बाजूला पडला आहे, हे ठळकपणे दिसून येत आहे. भाजपला तब्बल 132 जागा मिळाल्या आहेत. काही अपक्षांनीही भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे तसे पाहिले तर भाजपला ना शिंदेंची गरज आहे ना अजितदादा पवारांची. ठाकरे यांच्या शिवसेनेचे 20 आमदार निवडून आलेले आहेत, हेही लक्षात घ्यावे लागेल. अशा परिस्थितीत शिंदेंना डिवचण्याची एकही संधी सोडायची नाही, असे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी ठरवल्याचे दिसत आहे. मित्रपक्षांनी अजिबात हालचाल करून चालणार नाही, अशा भक्कम अवस्थेत भाजप आहे.

समजा एकनाथ शिंदे यांनी असे ठरवले की, आपल्याला आता भाजपसोबत जायचे नाही, तर काय होईल? होईल असे की त्यांचे अनेक शिलेदार थेट भाजपमध्ये जातील, पण सत्ता सोडणार नाहीत. त्यामुळेच शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले आहे. परिणामी शिंदे शांतच राहणार आहेत. अजितदादा पवार तर सत्तेसाठीच भाजपसोबत(BJP) गेले आहेत. विकासासाठी सत्तेसोबत राहावे लागते, असे त्यांनी मागे अनेकवेळा सांगितले आहे. त्यामुळे पुढची पाच वर्षे महायुती सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

हे 9 खासदार भाजपलाही खुनावत असणार -

तिकडे, महाविकास आघाडीत(MVA) अस्वस्थतता आहे. तिन्ही पक्षांना मिळून केवळ 46 जागा मिळाल्या आहेत. शरद पवार हेही भाजपसोबत जाणार, असे दावे काही नेत्यांकडून उघडपणे केले जात आहेत. काँग्रेस कणखर नेतृत्वाच्या शोधात चाचपडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हातून सर्व काही म्हणजे पक्ष, चिन्ह गेले आहे. 9 खासदार ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे. हे 9 खासदार भाजपलाही खुनावत असणार, कारण केंद्रात भाजपला कुबड्या घ्याव्या लागल्या आहेत. त्यांना आणखी आधार हवाच आहे.

उद्धव ठाकरे सोबत आले तर ते भाजपला हवेच आहे. ठाकरे -फडणवीस यांच्यात वाढत असलेली जवळीक शिंदे यांच्यानंतर राज ठाकरे यांच्यासाठीही डोकेदुखी ठरणार आहे. ही डोकेदुखी वाढवण्याची एकही संधी आता ठाकरे सोडणार नाहीत, असे चित्र दिसत आहे. दिल्लीत केजरीवाल यांना पाठिंबा देऊन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला(Congress) संदेश देऊन टाकला आहे. कोण सांगावे, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेरही पडू शकतील. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. ठाकरे यांना जवळ करण्याचे भाजपसाठी हे आणखी एक कारण आहे.

राजकारणात काहीही होऊ शकते, हे खरेच आहे. त्यामुळे ठाकरे आणि फडणवीस यांची जवळीक आणखी वाढू शकते. 'सामना'तून फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले, ते उगाच नाही. सत्तेसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी राजकीय पक्ष, नेते अगदी काहीही करू शकतात, हे गेल्या पाच वर्षांत दिसून आले आहे. त्यामुळे 2025 मध्येही तशाच घडामोडी घडल्या तर कुणालाही आश्चर्य वाटू नये. ठाकरेंच्या पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खरी शिवसेना ठाकरेंचीच, एकनाथ शिंदे यांनी पक्ष चोरला, असे विधान या माजी नगरसेवकांनी केले आहे. बदलते राजकारण समजून घेण्यासाठी हे विधान पुरेसे ठरणारे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT