Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Shivsena Nashik Convention : उद्धव ठाकरेंची नाशकातील डरकाळी; शिवसैनिकांसाठी ठरणार बूस्टर!

Sampat Devgire

India Alliance on Lok Sabha Election : चाळीस आमदारांसह बंडखोरी केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे श्रीराम मंदिराच्यानिमित्ताने हिंदूत्वाच्या वारूवर स्वार भाजप या दोन्ही आव्हानांना परतावून लावण्यात सज्ज असल्याचा संदेश नाशिकमध्ये पार पडलेल्या शिवसेना (ठाकरे गटाच्या) अधिवेशनातून देण्यात उद्धव ठाकरे बऱ्यापैकी यशस्वी झाले.

नाशिकमध्ये 1994 नंतर 30 वर्षांनी आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे शिवसेनेचे राज्य अधिवेशन झाले. शिवसेना सध्या अंतर्गत बंडाळी आणि भाजपच्या प्रोत्साहनातून झालेल्या 40 आमदारांच्या बंडखोरीने झुंजते आहे. दुसरीकडे ठाकरे गट इंडिया आघाडीचा घटक बनला आहे. यामध्ये हिंदूत्व नेमके कोणाचे? हा प्रश्न निर्माण करून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना नामोहरम करण्याची जोरदार मोहीम सुरू आहे. आगामी लोकसभेच्या दृष्टिकोनातून हे वातावरण ठाकरे गटाचे नवे आव्हान देणारे होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे अधिवेशन आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा नाशिकला झाली त्याचे बारीक निरीक्षण केले असता हे अधिवेशन अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आखण्यात आले होते. 22 जानेवारी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख त्यासाठी जाणिवपूर्वक निवडण्यात आली होती. नाशिकच्या काळाराम मंदिरात आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली. अयोध्या राम मंदिरासाठी कारसेवा केलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांना सभेमध्ये विशेष निमंत्रण देऊन त्यांचा सत्कार झाला.

याशिवाय एक अतिशय माहितीपूर्ण प्रदर्शन यानिमित्ताने भरविण्यात आले होते. त्यातून राम मंदिरासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व शिवसैनिकांचे योगदान किती महत्त्वाचे होते ते भाजपला वरचढ होते, हा संदेश देण्यात ते यशस्वी ठरले अतिशय काळजीपूर्वक या सर्व कार्यक्रमांची रचना करण्यात आली होती. त्यात सुभाष देसाई आणि खासदार संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची होती. याद्वारे ठाकरे गटाने एका दगडात दोन पक्षी मारून भाजप आणि शिंदे गटाची हवा काढून घेण्यात यश मिळविले.

अधिवेशनाच्या तयारीसाठी ठाकरे गटाचे राज्यातील आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी अतिशय मेहनत घेत होते. त्याचे परिणाम सभेला झालेली मोठी गर्दी यातून दिसून आले. यानिमित्ताने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार आणि मोजक्या पदाधिकारी यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी व्यक्तिशः संवाद साधला. या सर्व घटनाक्रमावर उद्धव ठाकरे यांनी सभेत केलेले भाषण कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यात यशस्वी ठरले. ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे विरोधकांनादेखील खोडता आलेले नाही.

जाहीर सभेत आणि अधिवेशनात बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक ही आपली वडिलोपार्जित संपत्ती आहे. तिच्यावर फक्त आपला हक्क आहे, हे त्यांनी वारंवार वदवून घेतले. यानिमित्ताने शिवसेनेचे चिन्ह मिळविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यशस्वी झाले असले, तरी कार्यकर्ते ठाकरे यांच्याबरोबरच आहेत. तेच एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. हा संदेश या अधिवेशनाने दिला. विशेषतः उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार भाजपचे विरोधी पक्षांवर दबावाचे राजकारण आणि सत्तेच्या माध्यमातून राजकीय पक्ष फोडणे, शिवसेनेच्या नेत्यांवर तपास यंत्रणेंचा चौकशीचा ससेमिरा आणि महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेऊन केलेला अन्याय याचे परिमार्जन कसे करणार? याचे उत्तर भाजपला शोधावे लागणार आहे.

या सभेनंतर लगेचच मुख्यमंत्री शिंदे यांना त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागली. यातून उद्धव ठाकरे यांचा बाण विरोधकांच्या वर्मी बसला आहे, असे स्पष्ट होते. त्यामुळे आगामी राजकारणात कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यात व विरोधकांना मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब करून उद्धव ठाकरेंनी नाशिकचे अधिवेशन यशस्वी केले. यातून येत्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाचे महत्त्व आणि राज्यातील मतदारांमध्ये ठाकरे गटाविषयीची सहानुभूती वाढविण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT