dhananjay mahadik
dhananjay mahadik 
विश्लेषण

धनंजय महाडिकांना उद्धव ठाकरेंचा दणका

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आपल्या संस्थांना आर्थिक मदत मिळविण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना दणका देण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडी सरकारने केला.

माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे व सोलापूर जिल्हातील नेते कल्याणराव काळे यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने 310 कोटी रुपयांची बॅंकहमी देण्याचा निर्णय घेतला होता.

हा निर्णय सरकारच्या शेवटच्या काळात घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून भाजप सरकारच्या निर्णयाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. आज या चार साखर कारखान्यांना केलेल्या मदतीचा निर्णय रद्द करण्यात आला. महाडिक यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. विनय कोरे यांनी कोल्हापुरात शिवसेनेच्या विधानसभेच्या जागा पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप सेना नेत्यांनी केला होता. कोरे यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचीही कोंडी शिवसेना सरकारने केली आहे. पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले होते. तसेच ठाकरे हे देखील गोपीनाथगडावर दर्शनासाठी गेले होते. तरी त्यांच्याही कारखान्याची थकहमी रद्द झाली आहे. कल्याण काळे हे पंढरपुरातील नेते फडणवीस यांच्या जवळ गेले होते. त्यांनाही ठाकरे यांनी अडचणीत आणले आहे. सरकारने थकहमी नाकारल्याने या कारखान्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग अवघड होणार आहे. 

माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी या निर्णयावर टीका करत सरकारची ही सूडबुद्धी असल्याचा आऱोप केला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT