Joe Biden, Narendra Modi and Vladimir Putin
Joe Biden, Narendra Modi and Vladimir Putin  Sarkarnama
विश्लेषण

युक्रेनचं युद्ध अन् रशिया-अमेरिका यांच्या वादात भारताचं सँडवीच

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनविरूध्द (Russia-Ukraine Crisis) युध्द सुरू केले आहे. जगातील इतर देशांनी यात ढवळाढवळ करु नये, असा गर्भित इशारा रशियाने (Russia) दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. युक्रेन (Ukraine) प्रकरणी भारताने अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. यामुळे अमेरिकेने (USA) आता भारतावर दबाव आणण्यास सुरवात केला आहे. अमेरिका आणि रशिया यांच्या कोंडीत भारत अडकल्याचे चित्र आहे.

भारत आणि रशियाचे संबंध खूप आधीपासून चांगले आहेत. मात्र, मागील काही वर्षांत भारताचे अमेरिकेसोबत संबंध वाढले आहेत. रशिया आणि युक्रेनच्या युद्धात त्यामुळे भारताने कोणतीही भूमिका घेणे टाळले आहे. याचवेळी अमेरिका, ब्रिटनसह इतर देश रशियाच्या आर्थिक नाड्या आवळू लागले आहेत. रशियाविरोधातील आघाडीत अनेक देशांना सामावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी भारताच्या भूमिकेबाबत विचारणा केली असता भारताचा अद्याप निर्णय झाला नसल्याचे म्हटले आहे.

रशियाच्या विरोधात अमेरिकेसोबत भारत उभा आहे का? असा प्रश्न बायडन यांना विचारण्यात आला. आमची भारतासोबत चर्चा सुरू असून, आम्ही या प्रकरणी अंतिम निर्णयापर्यंत अद्याप पोचलो नाही, असे उत्तर बायडन दिले होते. भारत आणि अमेरिका यांचे युक्रेनच्या मुद्द्यावर एकमत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अमेरिका विविध पातळ्यांवर भारताशी चर्चा करीत आहे. युक्रेनच्या संकटात भारताने अमेरिकेसोबत उभे राहावे, यासाठी दबाव दिवसेंदिवस वाढत आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी 24 फेब्रुवारीला पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी आज थेट पुतीन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. युक्रेनमधील हिंसाचार तातडीने थांबवावा, असे आवाहन मोदींनी केले. राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून रशिया आणि युक्रेनने हा वाद सोडवावे, असे मोदींनी स्पष्ट केले. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत पुतीन यांना युक्रेनसंबंधीच्या सध्याच्या घडामोडींची माहिती मोदींना दिली. रशिया आणि नाटो यांच्यातील मतभेद प्रामाणिक चर्चेच्या माध्यमातून सुटतील, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी आता थेट रशियासोबतच्या संघर्षात भारताच्या मध्यस्थीची मागणी आज सकाळीच केली होती. मोदी आणि व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे संबंध चांगले असल्याचा दाखला त्यांनी दिला होता. ते म्हणाले होते की, मोदी हे जगातील सामर्थ्यवान आणि सन्माननीय नेते आहेत. भारताचे रशियासोबत अतिशय चांगले सामरिक संबंध आहेत. मोदींजींनी पुतीन यांच्याशी संवाद साधल्यास ते नक्कीच प्रतिसाद देतील, अशी आम्हाला आहे. केवळ युक्रेनच्या नागरिकांसाठी नव्हे तर तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी भारताचा हस्तक्षेप महत्वाचा आहे. आम्हाला केवळ राजशिष्टाचाराचे निवेदन नको. आम्हाला सगळ्या जगाकडून पाठिंबा हवा आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनच्या दॉनबस भागामध्ये लष्करी कारवाई सुरू केली आहे. शस्त्र टाका अन्यथा रक्तपात अटळ आहे, असा इशाराही रशियाने दिला आहे. तसेच, रशियाच्या युक्रेन ऑपरेशनमध्ये हस्तक्षेप करणार्‍यांना आपण तात्काळ उत्तर देऊ, असा थेट इशारा पुतीन यांनी दिला आहे. सोबतच रशियाने केलेली कारवाई ही स्वसंरक्षणासाठी असल्याचे सांगत त्यांनी कारवाईचे समर्थन केले आहे. पुतीन यांनी म्हटले आहे की, रशियाच्या कारवाईत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न केल्यास त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आमच्या नागरिकांना किंवा देशाला हानी पोचवण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या इतिहासात कधीही अनुभवले नसेल एवढे भयानक परिणाम होतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT