Usmanabad - Omraje Nimbalkar upsets Rana Jagjitsinh Patil in Kalamb  
विश्लेषण

राणाजगजितसिंह पाटलांना शिवसेनेच्या राजेनिंबाळकरांचा हादरा 

उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणात आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यातील राजकीयवैर सर्वश्रुत आहे. कळंब पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे दोघे आमने-सामने आल्याचे दिसून आले होते.

दिलीप गंभीरे

कळंबः उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कंळब पंचायत समितीवर अखेर भगवा फडकवण्यात शिवसेनेला यश आले आहे. पाटील गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील तीन सदस्यांना आपल्या बाजूने वळवत राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातील पंचायत समिती शिवसेनेकडे खेचून आणली.

 9 विरुध्द 7 अशा मतांनी शिवसेनेच्या संगीता वाघे, उपसभापती पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुणवंत पवार हे विजयी झाले आहेत. कळंबची पंचायत समिती ताब्यातून जाणे हा राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणात आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यातील राजकीय  वैर सर्वश्रुत आहे. कळंब पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे दोघे आमने-सामने आल्याचे दिसून आले होते.

 अगदी सदस्य पळवल्याचा आरोप करत पिस्तूल घेऊन धमकावल्या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात राणाजगजितसिंह पाटील व त्यांच्या इतर अकरा समर्थकांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. तर राणा यांच्या तक्रारीवरून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला.

या पार्श्‍वभूमीवर आज (ता. 1) कळंब पंचायत समिती निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. कळंब तालुका राणाजगजितसिंह पाटील यांच्या राजकीय वाटचालीसाठी महत्वाचा मानला जातो. 

उस्मनाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातून राणा यांना कळंब तालुक्‍याने नेहमीच मताधिक्‍य दिलेले आहे. शिवाय तालुक्‍यातील खरेदी विक्रीसंघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपरिषद, ग्रामपंचायतीवर राणा यांचेच वर्चस्व राहिले आहे.

विधानसभा निवडणुकीआधी राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला. त्यामुळे कळंब या राणांच्या बलस्थानवरच घाव घालण्याची रणनिती त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आखली होती.

आमदार कैलास पाटील यांच्या मदतीने खासदारांनी आखलेले डावपेच यशस्वी ठरले आणि राणा पाटील यांच्या ताब्यत असलेली कळंब पंचायत समिती शिवसेनेकडे आली. या निवडणुकीची तयारी खासदार निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी बऱ्याच दिवसांपासून सुरू केली होती.

कळंब पंचायत समितीतील एकूण 16 पैकी दहा सदस्य हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे म्हणजेच राणाजगजितसिंह यांना मानणारे होते. पण राणा यांनीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत तुळजापूरमधून निवडणूक लढवल्याने काही सदस्य नाराज होते.

तुळजापूर आणि कळंबचा तसा फारसा राजकीय संबंध येत नसल्याने हे सदस्य नव्या पर्यायाच्या शोधात होते. याची कुणकुण लागल्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत राणाजगजितसिंह यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही.

राणाजगजितसिंह पाटलांना चेकमेट

दुसरीकडे राजेनिंबाळकर, पाटील जोडगळीने राष्ट्रवादीतील नाराज तीन सदस्यांना सहलीवर नेत राणाजगजितसिंह यांना पहिला धक्का दिला. कळंब पंचायत समिती ताब्यातून जाणे आपल्या राजकीय भवितव्यासाठी धोका ठरू शकते हे ध्यानात आल्यामुळेच राणाजगजितसिंह पाटील यांनी शिवसेनेने पळवलेल सदस्य परत आणण्यासाठी साम, दाम, दंड भेद या सगळ्या अयुधाचा वापर केला, पण त्यातून काहीच साध्य झाले नाही.

आज झालेल्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत नायगाव पंचायत समिती गणातील शिवसेनेच्या संगीता गोविंद वाघे यांची तर जवळा (खुर्द) गणाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुणवंत पवार यांची निवड करण्यात आली.

 राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सभापतिपदासाठी नंदूबाई माने व उपसभापतिपदासाठी रत्नदीप देशमुख यांनी अर्ज दाखल केले होते. यावेळी 16 सदस्यांपैकी शिवसेनेच्या सहा, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन सदस्यांची मते संगीता वाघे व गुणवंत पवार यांना मिळाली. त्यामुळे या दोघांचा विजय झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT