Ravindra Gaikwad, tanaji savant  Sarkarnama
विश्लेषण

Tanaji Sawant News : दरी वाढली ? सावंतांची दांडी अन् गायकवाडांचा मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास

अय्यूब कादरी

Shivsena News: धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना उमरगा तालुक्याबाबत राग आहे की काय, अशी शंका त्यांनी आजपर्यंत उमरग्याला एकदाही न दिलेल्या भेटीवरून येते. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हे शिवसेनेकडून (शिंदे गट) इच्छुक आहेत. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सावंत आणि उमरगा ही दरी आणखी वाढल्याचे दिसत आहे.

उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मुलाचे लग्न १७ फेब्रुवारीला झाले. लग्नपत्रिकेवर प्रेषक म्हणून पालकमंत्री सावंत यांचेही नाव होते. त्यामुळे यानिमित्ताने तरी ते उमरग्याला येतील, असे चित्र निर्माण झाले होते. सावंत हे त्या दिवशी शिवसेनेच्या अधिवेशनासाठी कोल्हापुरात होते. तब्येत बरी नसल्यामुळे ते उमरग्याला येऊ शकले नाहीत, अशी चर्चा आहे.

धाराशिवचे पालकमंत्री झाल्यापासून डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे एकदाही उमरग्याला आलेले नाहीत. या विवाह सोहळ्याला सर्व पक्षांतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री साडेबारा वाजता येऊन वधू-वरांना आशीर्वाद दिले. Tanaji Sawant News

कोल्हापूर येथे शिवसेनेचे अधिवेशन सुरू होते. त्यामुळे विवाह सोहळ्याला येण्यासाठी मुख्यमंत्र्यांना उशीर लागला. विमानाच्या नाइट लँडिंगची सोय बिदर (कर्नाटक) विमानतळावर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) विमानाने बिदरला आले. तेथून त्यांना उमरग्यापर्यंत वाहनाने यावे लागले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी प्रा. गायकवाड हे बिदरला गेले होते. या जवळपास दोन तासांच्या प्रवासात माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्याच वाहनात होते. शिवसेनेत फूट पडली, त्यावेळी प्रा. गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही दिवसांनंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना उमेदवारीचा शब्द दिला होता, असे सांगितले जाते.

काही महिन्यांपूर्वी प्रा. गायकवाड यांनी धाराशिव येथे पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी तयारीही सुरू केली होती. मात्र, जानेवारीत धाराशिव येथे झालेल्या महायुती समन्वय समितीच्या मेळाव्यात प्रा. गायकवाड यांना भाषण करण्याची संधी न देता सावंतांनी झटका दिला होता.

या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचा भावी खासदार, असा उल्लेख असलेली पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आली होती. मेळाव्याच्या काही दिवसांनंतर धनंजय सावंत यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. कळंब शहरासह काही भागांत तसे बॅनर लावण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालकमंत्री सावंत आणि माजी खासदार प्रा. गायकवाड यांच्यात फारसे सख्य असल्याचे चित्र यापूर्वीही दिसले नव्हते. उमेदवारीच्या प्रकरणानंतर आता त्यांच्यातील दरी आणखी वाढल्याचे दिसत आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेलाच (Shivsena ) सुटणार आणि उमेदवारी आपल्यालाच मिळणार, याबाबत प्रा. गायकवाड यांना पूर्ण विश्वास आहे, असे प्रा. गायकवाड यांच्या बोलण्यातून जाणवते.

आमदार चौगुले यांच्या मुलाच्या लग्नाला सावंत यांची अनुपस्थिती आणि प्रा. गायकवाड यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतचा प्रवास, यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत सस्पेन्स आणखी वाढला आहे. बिदर ते उमरगा या प्रवासात प्रा. गायकवाड आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात काय चर्चा झाली असेल, याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT