C.P. Radhakrishnan Sarkarnama
विश्लेषण

Vice President News: भाजपची खेळी! उपराष्ट्रपतीपदासाठी सी.पी. राधाकृष्णन हेच उमेदवार का? RSS, दक्षिण भारत, अन् सामाजिक समीकरण..

Why BJP chose C.P. Radhakrishnan for Vice President Candidate: उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पुढील महिन्यात ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी सी. पी. राधाकृष्णन यांचे नाव एनडीएचे उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले आहे.

Mangesh Mahale

थोडक्यात

  1. सी.पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी: एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची घोषणा करून भाजपने मोठा राजकीय डाव टाकला आहे.

  2. दक्षिण भारतावर लक्ष: राधाकृष्णन तामिळनाडूचे असून दक्षिण भारतात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी भाजपनं ही चाल खेळली आहे.

  3. ओबीसी समीकरण आणि संघ नाळ: ते ओबीसी समाजातील असून, संघाशी जवळीक असलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे सामाजिक संतुलन साधत विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा भाजपचा हेतू आहे.

Vice President Election News : उपराष्ट्रपतीपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. 'एनडीए'कडून सी. पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. सी.पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करुन भाजपने अनेक राजकीय समीकरणे जुळवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. देशात होण्याऱ्या आगामी निवडणुका लक्षात घेता भाजपनं ही नवी चाल खेळली आहे. इंडिया आघाडीकडून मात्र अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही.

जगदीश धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून कोण उमेदवार असणार याबाबतची चर्चा सुरु होती. रविवारी सत्ताधारी 'एनडीए'कडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी एनडीएकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधण्यात येत आहे.

सी.पी. राधाकृष्णन यांच्याच नावांची निवड करण्यामागे भाजपची मोठी रणनीती आहे. सी.पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करुन कार्यकर्त्यांना संदेश दिला असून दक्षिण भारतात भाजपचा खुंटा मजबूत करण्यासाठी हा प्रयत्न आहे. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती करुन भाजपला काय साध्य करायचे आहे, हे जाणून घेऊन या!

सी.पी. राधाकृष्णन हे तामिळनाडू येथील आहेत. त्यामुळे तेथे भाजप संघटन मजबूत करण्याचा भाजप प्रयत्न करणार असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे दोन्हीही उत्तर भारतातील आहेत. अशातच दक्षिण भारतात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी, दक्षिण भारतात राजकीय संतुलन साध्य करण्याठी सी.पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे दिसते.

दक्षिणेतील कुठल्याही राज्यात भाजपची सत्ता नाही, आंध्र प्रदेश आणि पुडुचेरी सरकारमध्ये भाजपचा सहभाग आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील वर्षी विधान सभा निवडणूक होणार आहे. तामिळनाडू हे सी.पी. राधाकृष्णन यांचे होमटाऊन आहे. भाजपला मजबूत करण्यासाठी त्यांनी यापूर्वीही त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत. ते प्रदेशाध्यक्ष होते. दोन वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. सी.पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करुन एआईएडीएमके आणि डीएमके सारख्या पक्षांना भाजपने संकटात टाकले आहे.

तामिळनाडू मधील जनतेला संदेश देण्यासाठी भाजपची ही चाल असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. सी.पी. राधाकृष्णन यांनी तामिळनाडूसह अन्य राज्यातही भाजपसाठी काम केले आहे. अशातत आता दक्षिण भारतात भाजपला आपले संघटन मजबूत करायचे आहे. तामिळनाडू आणि केरळ अशी राज्य आहेत, की भाजपची ताकद येथे कमी पडत आहे.

सी.पी. राधाकृष्णन हे मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. जनसंघाच्या काळात ते भाजपमध्ये सक्रिय झाले. आरएसएस राजकारणापासून अलिप्त असला तरी देशाच्या सर्वोच्च पदावर आपल्या संघाच्या विचारसरणीची व्यक्ती असावी, अशी संघाची भूमिका आहे. संघाची नाळ जोडून ठेवण्याासाठी भाजपचे सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली आहे. या माध्यमातून भाजप आणि संघ यांच्यात सुसंवाद असल्याचे त्यांना दाखवून द्यायचे आहे.

सी.पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर करुन भाजप प्रादेशिक आणि सामाजिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करीत आहे. ते ओबीसी समाजातील आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड हेही ओबीसी समाजातील होते. ओबीसी समाजातील व्यक्तींला या पदावर संधी देत विरोधकांचे तोंड बंद करण्याचा भाजपचा हा डाव आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नेहमीच ओबीसी मुद्यांवरुन आक्रमक होत असतात. जातीगणना, सरकारमध्ये दलित-ओबीसी यांची किती वाटा आहे? असे विविध प्रश्न राहुल गांधी उपस्थित करीत असतात. त्यांच्या विरोधाची धार कमी करण्यासाठी भाजपची ही खेळी आहे.

मोदी सरकारने जाती जनगणनेची घोषणा केली आहे. देशात 50 टक्क्यांपेक्षा अधिक ओबीसी समाज आहे. बिहारच्या सत्तेच्या चाव्या ओबीसी समाजाकडे आहेत. येत्या विधानसभेत बिहारमध्ये ओबीसी व्होटबॅंकवर भाजपचा डोळा आहे.

या पार्श्वभूमीवर कुठलीही जोखीम भाजप घेऊ इच्छित नाही. त्यासाठी ओबीसी व्यक्तीलाच उपराष्ट्रपदी कऱण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. अनेक दशकापासून राधाकृष्णन हे भाजपमध्ये सक्रीय आहे. तामिळनाडू भाजपचे सचिव, प्रदेशाध्यक्ष, कोयबंटून लोकसभेचे दोनदा खासदार असा, झारखंड, महाराष्ट्राचे राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

FAQ

प्र.1: एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार कोण आहेत?
उ.1: एनडीएकडून सी.पी. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

प्र.2: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत?
उ.2: ते तामिळनाडूचे नेते असून भाजपचे माजी खासदार, प्रदेशाध्यक्ष आणि सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

प्र.3: भाजपने राधाकृष्णन यांनाच का उमेदवार केले?
उ.3: दक्षिण भारतात भाजपचे बळकटीकरण, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व आणि संघाशी नाळ कायम ठेवण्यासाठी ही निवड झाली आहे.

प्र.4: या निर्णयाचा राजकीय फायदा कोणता होऊ शकतो?
उ.4: तामिळनाडू-केरळमधील संघटन मजबूत होणे, ओबीसी मतदारांना आकर्षित करणे आणि विरोधकांचा दबाव कमी करणे हा मुख्य फायदा अपेक्षित आहे.

SCROLL FOR NEXT