Vinayak METE Pankaja MUNDE CM Devendra Fadnavis
Vinayak METE Pankaja MUNDE CM Devendra Fadnavis 
विश्लेषण

विनायक मेटे फडणवीसांच्या रथावर आले आणि मुंडे भगीनी रथातून उतरल्या !

Dattatrya Deshmukh

बीड : नियोजित महाजनादेश यात्रेत ऐनवेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी रस्त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताचे नियोजन केले. त्यानुसार आयोजित कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रथ सत्कार स्विकारण्यासाठी थांबला.

परंतु, रथात असलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रितम मुंडे रथातून उतरुन निघून गेल्या.

घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामच्या स्वागताने भारावून गेल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

पुरामुळे स्थगित झालेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपची महाजनादेश यात्रा सोमवारी जिल्ह्यात पोचली. जिल्ह्यात दुपारी आष्टी व रात्री बीडला महाजनादेश यात्रेतील सभा आणि मुक्काम तसेच रस्त्याने काही ठिकाणी भाजप नेत्यांकडून स्वागत असे या यात्रेचे नियोजन होते.

परंतु, ऐनवेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी शहराजवळ शिवसंग्रामकडून यात्रेच्या स्वागताचे नियोजन केले. 

मुख्यमंत्री फडणवीसांनी हा कार्यक्रम स्विकारलाही. दरम्यान, जामखेड येथील सभा संपवून महाजनादेश यात्रेचा रथ रस्त्यावरील काही ठिकाणी स्वागत स्विकारुन बीडकडे मार्गक्रमण करत होता.

यात्रेच्या रथात मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री पंकजा मुंडे व भगीनी खासदार डॉ. प्रितम मुंडेही होत्या. मेटेंनी आयोजित स्वागतकार्यक्रम स्थळी रथ पोचल्यानंतर मुख्यमंत्री रथावर चढले. यावेळी मेटेही रथावर चढले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. 

परंतु,यावेळी  रथात असलेल्या पंकजा मुंडे व डॉ. प्रितम मुंडे उतरल्या आणि दुसऱ्या वाहनाने बीडकडे निघून गेल्या.

दरम्यान, घटकपक्षातील शिवसंग्रामने आयोजित स्वागतामुळे भारावून गेल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तर, शिवसंग्राम पुर्वीही भाजपसोबत होती, आताही असून पुढेही राहील असे विनायक मेटे म्हणाले.

पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे.आता विधानसभेच्या ताेंडावर हा प्रकार घडल्याने निवडणुकीत दाेघांची एकमेकांबद्दल काय भूमिका असेल ते वेगळे सांगण्याची गरज नाही.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT