Mete-becomes-poet
Mete-becomes-poet 
विश्लेषण

विनायक मेटे म्हणतात.. कदम लड़खड़ा रहे है पर मंज़िल से भटका नहीं हूँ !

दत्ता देशमुख

बीड :

कदम लड़खड़ा रहे है पर मंज़िल के रास्तो से भटका नहीं हूँ,
अकेला ही चल रहा हूँ पर किसी हाथ का इंतज़ार नहीं हूँ,
अपनों ने दिलमें लगायी थी जो आग कभी उसे बुझाता नहीं हूँ ,
कभी रूका हूँ , कभी थका हूँ, पर हारा नहीं हूँ !

अशी पोस्ट शिवसंग्रामचे संस्थापक आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आपल्या फेसबुकवर टाकली  आहे.   


शिवाय  ‘जिंदगी के सफर से बस इतनाही सबक सिखा है सहारा कोई - कोई देता है’ लेकीन धक्का देने के लिए हर शख्स तैयार बैठा है’, अशी पोस्टही   आमदार विनायक मेटे यांनी आपल्या फेसबुकवर आज टाकली आहे  आहे. 

आजचा दिवस विनय मेटे यांची सत्वपरीक्षा पाहणारा आहे .  
एका बाजूला भाजपच्या नेत्या आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी असलेले तीव्र मतभेद तरदुसऱ्या  बाजूला कट्टर राजकीय विरोधक जयदत्ता क्षीरसागर यांना शिवसेनेने दिलेले कॅबिनेट मंत्री पद  यामुळे फायरब्रॅन्ड नेते विनायकराव  मेटे यांची बीड जिल्ह्याच्या राजकारणात कोंडी झाली आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेला स्नेहभाव हाच आता विनायक मेटे यांच्यासाठी महत्वाचा दुवा राहिलेला आहे. 

मराठा मोर्च्याच्या आणि आंदोलनांच्या काळात विनायक मेटे भक्कमपणे मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे होते . देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी आंदोलनाच्या काळात एकटे पडू दिले नाही. अगदी गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले  यांनी कुणबी कार्ड काढले तेंव्हाही विनायक मेटे त्यांचे संकटमोचक बनले आणि त्यांनी नागपुरात जाऊन कोंडी फोडली होती . रासपचे महादेव जानकार यांना मंत्रिपद मिळाले. स्वाभिमानीच्या राजू शेट्टींमुळे सदाभाऊ खोत मंत्री बनले. रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात लागोपाठ दुसऱ्यांदा स्थान मिळाले . पण विनायक मेटे यांच्यावर मंत्रिपदाची मोहोर अखेरपर्यंत उमटलीच नाही . 

विधानसभा निवडणुकीच्या नंतर पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यात राजकीय दुही निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटेंना राजकीय बळ दिले. मात्र, हे बळ मेटेंच्या मैत्रीखातर होते कि पंकजा मुंडेंना शह देण्यासाठी मोहरा म्हणून मुख्यमंत्र्यांनी मेटेंचा वापर केला असा प्रश्न सध्याच्या राजकीय घडमोडींवरुन उपस्थित होत आहे. घटक पक्षातील सर्व पक्षांना सुरुवातीलाच सत्तेचा वाटा मिळाला. मात्र, उपेक्षित राहीली ती शिवसंग्राम. 

नंतरच्या काळातही भाजपच्या बड्या नेत्यांकडून शिवसंग्राम बाबत आशावाद निर्माण केला जाई. त्यामुळे आज ना उद्या सत्तेचा वाटा मिळेल अशी शिवसंग्रामला अपेक्षा होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना आणि विनायक मेटे समर्थकांना महामंडळांवर स्थान मिळाले. पण, विनायक मेटे यांना शिवस्मारक समिती अध्यक्षपदावरच समाधान मानावे लागले. 

मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मैत्रीखातर ‘मराठा समाजासाठी सर्वाधिक चांगले निर्णय केवळ देवेंद्र फडणवीसांनीच घेतले’, असे त्यांनी वारंवार सांगितले आहे .मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांनी आपण सुचवलेल्या सर्व प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांचे आपल्याला समाधान आहे , त्यामुळे  त्यांनी आपल्याला मंत्रीपद दिले नाही तरी त्याची  खंत नाही, असे विनायक मेटे नेहमी म्हणत राहीले.

देवेंद्र फडणवीसांनी मेटेंना दिलेले बळ घटक पक्षाचे नेते म्हणून, मित्र म्हणून कि त्यावेळी त्यांनाच पंकजा मुंडेंना शह देणारा मोहरा हवा होता म्हणून दिले अशी चिकीत्सा करण्याची वेळ आता मेटेंवर आली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या निष्ठावंत मित्राचे , विनायक मेटे यांचे बीड जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात महत्व टिकून राहावे यासाठी काय चमत्कार करतात याकडे मेटे समर्थकांचे लक्ष्य लागलेले आहे . 

शेवटचा मंत्रीमंडळ विस्तार हेाताना त्यांना तर संधी मिळालीच  नाही शिवाय त्यांचे कट्टर विरोधक जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळाले  आहे. बीड ही शिवसेनेची जागा असल्याने भविष्यात क्षीरसागरांसाठी ही जागाही सुटेल असे चित्र आहे. त्यामुळे घटक पक्ष म्हणून शिवसंग्रामचे महायुतीतील स्थान काय, असा प्रश्न आहे. त्याचाच मतितार्थ विनायक मेटे यांनी रविवारी मंत्रीमंडळ विस्तारानंतर लिहलेल्या वरील फेसबुकमध्ये तर नाही ना अशी चिकीत्सा आता राजकीय जाणकार करत आहेत. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींनी विनायक मेटेंना आपले मन मोकळे करण्यासाठी शेरोशायरीचा आसरा घ्यावा लागला एवढे निश्चित आहे .   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT