ajitdada_pawar
ajitdada_pawar 
विश्लेषण

आता लगेच मतं मागायला येणार नाही,स्थिर सरकार मिळेल : अजित पवार 

सरकारनामा

सोमेश्वरनगर : "मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले; परंतु दोघांमध्ये काय बेबनाव झाला माहिती नाही, पण मार्ग निघाला नाही. म्हणून राष्ट्रपती राजवट लागू झाली. आता काहीही झालं तरी लगेच मतं मागायला येणार नाही. लवकरच स्थिर सरकार मिळेल,'' असे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

दरम्यान " तिघांनी एकत्र आल्याशिवाय मार्ग निघणार नाही. आमचे सर्वोच्च नेते चर्चा करून निर्णय घेतील,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) येथील सोमेश्वर साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या प्रारंभावेळी ते बोलत होते.


" साहेबांची पावसातली सभा, त्यांच्याबद्दलची काहींची नको ती विधानं आणि ईडी अशा गोष्टींनी राज्यातील जनतेची मनं दुखावली आणि त्यांचं परिवर्तन निकालात झालं. त्यामुळे काहींना जबरदस्तीनं तिकीट दिलं तेही आमदार झाले. सर्वाधिक जागा मिळवूनही 'ते' असमाधानी आहेत आणि आम्ही मात्र बहुमत नसतानाही समाधानी आहोत. पण शेवटी 145 चा आकडा गाठायचा आहे."

" कुणालाही पुन्हा निवडणूक नको आहे. येत्या मंगळवारी (ता. 19) सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक आहे. त्या - त्या पक्षाचे सर्वोच्च नेते चर्चा करून ठरवतील. आम्हालाही सर्व मित्रपक्षांची बैठक घेता आली नाही. त्यांनाही बोलावून सांगावे लागेल. आता आम्ही सत्तेत आलो तर तिजोरीची अवस्था बघून जास्तीत जास्त आश्वासनांची पूर्तता करणार,'' अशी ग्वाही पवार यांनी दिली.

'सोमेश्वर'चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष शैलेश रासकर यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT