Left Parties in West Bengal
Left Parties in West Bengal Sarkarnama
विश्लेषण

डाव्यांचं जोरदार कमबॅक! मतांच्या टक्केवारीत भाजपसह काँग्रेसलाही टाकलं मागं

सरकारनामा ब्युुरो

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवल्यापासून डाव्या पक्षांची (Left Parties) पिछेहाट सुरू होती. राज्यात डाव्यांचे अस्तित्व संपल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी जोरदार कमबॅक केले आहे. डावे पक्ष संपल्याची ओरड करणाऱ्या इतर राजकीय पक्षांना आता राज्यातील महापालिका व नगपालिका निवडणुकांतून उत्तर मिळाले आहे. या निवडणुकांत मतांच्या टक्केवारीत सत्ताधारी तृणमूलनंतर डाव्यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा डाव्यांचे प्राबल्य बंगालमध्ये वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

राज्यात नुकत्याच झालेल्या 108 महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांत तृणमूलने (TMC) बाजी मारली. याचवेळी डाव्यांनी एका महापालिकेवर झेंडा फडकावला आहे. राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला (BJP) एकही महापालिका जिंकता आलेली नाही. काँग्रेसचीही (Congress) तीच अवस्था आहे. मात्र, डाव्यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे. यामुळे बंगालमध्ये पुन्हा एकदा डावे पक्ष उभारी घेऊ लागल्याचे चित्र आहे. डाव्यांनी ताहेरपूर महापालिकेत त्यांनी विजय मिळवला आहे.

या निवडणुकांतील मतांची टक्केवारी पाहिल्यासही डावे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तृणमूल काँग्रेसला या निवडणुकांत 63 टक्के मते मिळाली आहेत. याचवेळी डाव्यांना 14 टक्के तर भाजपला 13 टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसला 5 टक्के तर इतरांना 5 टक्के मते मिळाली आहेत. डाव्या पक्षांच्या या कामगिरीबद्दल बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सुजन चक्रवर्ती म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांचे अस्तित्व संपल्याची चर्चा सुरू असताना त्यांनी निवडणुकीतून पुन्हा आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. या निवडणुकांत अनेक गैरप्रकार होऊनही आम्ही कमबॅक केले आहे. या निवडणुकीतील आम्हाला चांगली मते मिळाली आहेत.

राज्यातील 108 महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांपैकी (Civic Polls) 102 ठिकाणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसने (TMC) विजय मिळवला आहे. डाव्यांना एका ठिकाणी विजय मिळाला असून, भाजप आणि काँग्रेसला (Congress) खातेही खोलता आलेले नाही. या निवडणुकीत एकूण 2 हजार 171 जागा होत्या. त्यातील तब्बल 1 हजार 870 जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. भाजपला 63 जागा जिंकता आल्या आहेत. काँग्रेसला 59 तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 55 जागा मिळाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT