Pankaja Munde sarkarnama
विश्लेषण

दसरा मेळाव्यात पंकजा उत्स्फूर्तपणे बोलणार...पण निशाण्यावर कोण राहणार?

मंत्रिमंडळात भागवत कराड यांना संधी मिळाली.

अमोल जायभाये

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे येत्या 15 ऑक्टोबर रोजी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात पंकजांच्या निशाण्यावर कोण असणार? त्या दसरा मेळाव्यात (Dasara melava) काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (What will Pankaja Munde say at the Dasara melava)

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील 12 एकर परिसरात होणार आहे. मेळाव्याआधी गडाच्या परिसरातील कामांनी वेग घेतला आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांच्याही विविध जिल्ह्यामंध्ये मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात नियोजन बैठका सुरु आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत प्रत्यक्षात दसरा मेळावा झाला नव्हता. पंकजा यांनी दसऱ्याला कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला होता. या दोन वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. दसरा मेळावा हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठे शक्तीप्रदर्शनच असते. त्या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संदेश देत असतात.

दरम्यानच्या, काळात केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये पंकजा यांच्या भगिनी व बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यांच्या ऐवजी भागवत कराड यांना संधी मिळाली. त्यावरुन पंकजा यांच्या कार्याकर्त्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर मुंबई येथे नाराज कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. त्यामध्ये बोलताना पंकजा यांनी माझे नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा असल्याचे म्हटले होते. यावेळी पंकजा यांनी मनातील खदखद बोलून दाखवली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरु असल्याचीही चर्चा सुरु होती. त्यामुळे या मेळाव्यात पंकजा काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

त्याच बरोबर पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासह राज्य सरकारही त्यांच्या निशाण्यावर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अतिवृष्टीमुळे बीडसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना मदत मिळालेली नाही, या मुद्दयावरून त्या सरकारला घेरण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांकडेही त्या सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले जात आहे. दसरा मेळाव्या संदर्भात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, दसरा मेळावा आमची परंपरा आहे. मंदिर खुली झाली आहेत, त्यामुळे यावर्षी दसरा मेळावा होणार आहे. मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. नेता असो की कार्यकर्ता सर्व सहभागी होतात, असे सांगतानाच मेळाव्यात मी काय बोलणार ऐकायला या. काय बोलायचे ते उत्स्फूर्त बोलेन, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी उत्स्फूर्त भाषण करेन असे सांगून त्यांच्या भाषणाबाबतचा सस्पेन्स वाढवला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन होता. अनेक निर्बंध लादण्यात आल्याने गेल्या दोन वर्षांत दसऱ्या मेळाव्याचा जाहीर कार्यक्रम झाला नाही. पहिल्यांदाच अटी आणि नियम घालून दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे भगवान भक्तीगडावर पुन्हा त्याच जोशात दसरा मेळावा होणार आहे. या निमित्ताने दोन वर्षांनंतर मुंडे शक्ती प्रदर्शन करून अनेकांना सूचक इशारा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी बीडसह राज्यभरातील पंकजा यांचे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाबरोबरच महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT