विश्लेषण

`राष्ट्रवादीच्या सातबाऱ्यावर ज्यांची सुरवातीपासून नावे तेच झाले फितूर`

नेताजी नलवडे

वाशी ः तोडफोडीचे राजकारण करुनच भारतीय जनता पक्ष सध्या मोठा होण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातबाऱ्यावर ज्यांचे नाव सुरवातीपासून आहे, ज्यांनी वर्षानुवर्षे या पक्षाच्या नावावर सत्ता भोगली, तेच निष्ठेला तिलांजली देत पक्षातंराच्या भूमिकेत असतील तर अशा फितुरांच्या नादाला लागू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे वाशी (जि. उस्मानाबाद) येथे सोमवारी (ता. 26) आगमन झाले. त्यानंतर आयोजित जाहिर सभेत श्री. पाटील बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे आम्ही खचलेलो नाहीत. निवडणुकीपेक्षाही महाराष्ट्रात शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारी हे प्रश्न खुप मोठे आहेत. संपूर्ण मराठवाडा दुष्काळाला तोंड देत आहे. मात्र सताधाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. यासाठीच ही शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आलेली आहे. आम्ही सत्तेत असताना मराठवाड्याचा मागसलेपणा दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. माञ मागील पाच वर्षांत हे काम थांबले आहे. या पाच वर्षांत निष्ठेची वाताहात झालेली आहे. थैली दिली की मंत्रीपद देणारी ही सत्ता आहे.

इमान खरेदीची भाषा ही सत्ता बोलत आहे. मात्र अशा औटघटकेच्या लोकांकडे जाऊ नका, आम्ही कायम आहोत. राजकारणात वाईट दिवस येतातच, मात्र त्यामुळे पक्ष बदलण्याची गरज नाही. पक्षाचे नेते शरद पवार यांच्या विचारांना महत्व द्या. स्वार्थासाठी पक्षातंर करणाऱ्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या, या जिल्ह्यातही कोणी बंडखोरी केली तर त्यांचाही पाडाव करायला विसरु नका, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, शिवस्वराज्य यात्रेला युवकांची मोठी गर्दी होत असल्याने सत्ताधारी घाबरले आहेत. पाच वर्षांची सत्ता उपभोगल्यानतंरही त्यांनी केलेली कामे सांगण्यासाठी सत्ताधाऱ्यांना यात्रा काढावी लागते. हे त्यांचे खुप मोठे अपयश आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे शहरात सकाळी अकरा वाजता आगमन झाल्यानतंर या यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरातील पारा चौक, शिवाजीनगर मार्गे ही शिवस्वराज्य यात्रा जुने बसस्थानक येथे आल्यानंतर या ठिकाणी सभा घेण्यात आली. 

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार सतीश चव्हाण, आमदार राहुल मोटे, अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, भारती शेवाळे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, अरुणोराव देशमुख, मच्छिंद्र कवडे, तालुकाध्यक्ष दिलीप घोलप, प्रशांत कवडे, संतोष पवार, विकास पवार, संतोष कवडे, हनुमंत पाटोळे, संदीप पाटील, जाकीर सौदागर, बालाजी मोटे, तात्यासाहेब गोरे, मधुकर मोटे,  सुंदरराव हुंबे यांची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT