Amit Shah-Uddhav Thackeray
Amit Shah-Uddhav Thackeray sarkarnama
विश्लेषण

मोठा भाऊ कोण, हे अमितभाईंनी 2014 मध्येच दाखवून दिलंय : फडणविसांनी सेनेला डिवचलं

सुशांत सावंत

मुंबई : अमित शहा (Amit Shah) यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या आपल्या कारकिर्दीत भाजपला (BJP) क्रमांक एकचा पक्ष देशात बनविले. पण त्यांनी महाराष्ट्रातही शिवसेना-भाजप युतीत मोठा भाऊ कोण आणि छोटा कोण, हा प्रश्न देखील सोडविला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी (Shivsena) युती तुटल्यानंतर राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनवून भाजपच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शहांच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

अमित शहा यांच्या भाजपच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीवरील पुस्तकाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. शहा यांचे संघटन कौशल्य सांगताना फडणवीस म्हणाले की अमित शहा यांचा जीवनपट या पुस्तकामुळे समोर आला आहे. भाजपच्या वाटचालीत अमित शहा यांचे योगदान यातून कळत आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पारखी आहेत. त्यामुळे त्यांनी हा हिरा शोधून काढला. संघ, अभाविप यांच्याशी शहांचा लहाणपणीच संबंध आला. त्यानंतर मोदींनी विविध जबाबदाऱ्या दिल्या. गृहमंत्री म्हणून त्यांनी गुजरातमधील गुन्हेगारी कमी केली. माफियांना वठणीवर आणले आणि जे वठणीवर येत नव्हते त्यांची चकमकीत खातमा केला. मात्र तत्कालीन युपीए सरकारने त्यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकले. मात्र तेथेही त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना गुजरातमधून तडीपार करण्यात आले. त्या वेळी त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली. या संधीचा योग्य उपयोग करत भाजपच्या तेथील संघटनेत नवीन चैतन्य आणले.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे संघटन कमकुवक होते. तिथल्या नेतृत्वाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढल्या नव्हत्या. पण अमित शहा यांच्याकडे सूत्रे आल्यानंतर सर्व प्रकारच्या निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर करत संघटना कार्यरत केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 80 पैकी 73 जागा भाजपने त्यामुळे जिंकल्या, अशी आठवण फडणवीस यांनी सांगितली.

महाराष्ट्रातील 2014 विधानसभा निवडणुकीविषयी फडणवीस यांनी भाष्य केले. शिवसेनेसोबत युतीत लढण्याची आम्ही तयारी करत होतो. मात्र अचानक युती तुटली. सर्व जागांवर उमेदवार शोधावे लागले. तेव्हा अमित शहा म्हणाले होते की काळजी करू नका आपण निवडून येऊ. शहा यांनी त्यावेळी दीड महिना मुंबईत मुक्कम केला होता. राज्यातील प्रत्येक मतदारसंघाची माहिती त्यांनी ठेवली आणि सूत्रे हलवली. शिवसेना मोठ भाऊ हे चित्र आधी होते. त्या एकाच निवडणूकीत सर्वांना कळाले की मोठा भाऊ कोण आहे ते! भाजपने 122 जागा जिंकत सत्ता स्थापन केली. यामागे अमित शहा यांचे मोठे कष्ट होते.

अमित शहा हे केवळ कठोर राजकारणी नाहीतर ते संवेदनशील व्यक्ती देखील आहेत. त्यांच्या घरी दोन चित्रे पाहावयास मिळतात. एक चित्र आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आणि दुसरे चाणक्यांचे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आहे. मराठ्यांच्या इतिहासावर ते तीन-साडेतीन तास सलग बोलू शकतात. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावरती अनेक साधने जमा केली आहेत. त्यांना त्यावर पुस्तक लिहायचे आहे, अशी माहिती फडणवीस यांनी सांगितली. अमित शहा हे उत्तम तबला वादक देखील आहेत, असाही त्यांचा छंद फडणविसांनी सांगितला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT