Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Political News
Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Political News Sarkarnama
विश्लेषण

शिवसेना संपवायला निघालेल्या फडणविसांना ठाकरे का फोन करतील?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज संध्याकाळी (ता. 28 जून) आपल्या पदाचा राजीनामा देणार, ठाकरे यांनी 21 जून रोजीच देवेंद्र फडणविसांना (Devendra Fadnavis) पुन्हा युती करण्यासाठी फोन केला होता, ठाकरे यांचा राजीनामा पवार आणि सोनिया गांधी यांनी रोखून धरला, अशा स्वरूपाच्या बातम्या आज दिवसभर सुरू होत्या. ठाकरे हे आपल्या पक्षातील बंडखोरीपुढे आता पुरते नमले असून त्यांनी आता आवराआवर केल्याचेही सांगण्यात येत आहे.

ठाकरे हे आजची मंत्रीमंडळाची बैठक झाली की राजीनामा देणार, अशी बातमी काही टिव्ही चॅनेल्सने वारंवार दाखवली. खरेतर ठाकरे हे राजीनामा देणार असल्याच्या बातम्यांचा रतीब हा 21 जून पासूनच सुरू आहे. शिवसेनेतील बंडावर त्यांनी 21 जून रोजी पहिल्यांदा फेसबुक लाईव्ह जाहीर केले तेव्हापासूनच ते राजीनामा देणार असल्याचा अंदाज वाहिन्या ठोकून देत आहेत. या फेसबुक लाईव्हला दहा ते 15 मिनिटांचा उशीर जाहीर केलेल्या वेळेपासून झाला. या फेसबुक लाईव्हमध्येच ठाकरे म्हणे आपला राजीनामा जाहीर करणार होते. या अवघ्या काही विलंबाच्या कालावधीत शरद पवार यांनी फोन करून ठाकरे यांचे राजीनामा न देण्यासाठी मन वळविल्याची लोणकढी थाप वाहिन्यांनी बातमी म्हणून चालवली. खरे तर या फेसबुक लाईव्हच्या वेळी एक साऊंड केबल तुटल्यामुळे घोटाळा झाला होता. त्यामुळे उशीर झाला. नंतर एका भाषणात आदित्य ठाकरे यांनी हे सांगितले होते.

उद्धव यांचे सरकार संकटात आहे का, तर नक्की आहे. पण ते असाच अर्ध्यावर डाव सोडतील, असे दिसत नाहीत. त्यांनी आपले आमदार सहजपणे गुहावटीला जाऊ दिले. ही चूक शिवसेनेला महागात पडली. या लढाईला अखेरचे उत्तर विधानसभेत मिळणार आहे. तोपर्यंत लढण्याचा शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. भाजपबाबत ठाकरे यांच्या मनात किती राग आहे, हे त्यांनी आपल्या गेल्या काही दिवसांतील वक्तव्यांवरून दाखवले आहे. भाजपची मंडळी ईडीच्या माध्यमातून आपल्या घरात घुसली, तरी तुमचे रक्त खवळत नाही का, असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला होता. त्यावरूनच भाजप आणि ठाकरे यांचे संबंध पहिल्यासारखे नाहीतच, हे स्पष्ट झाले आहे. तरीही ठाकरे यांनी फडणवीस यांना फोन केला, अशा बातम्या चालविण्यात आल्याचे दिसून आले. असा फोन झाले नसल्याचे स्पष्टीकरण नंतर शिवसेनेला द्यावे लागले.

राज्यात 2019 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युती तोडून महाविकास आघाडी स्थापन केली. त्यावरून भाजप ठाकरेंवर चिडून आहे. ठाकरेंनी त्यांच्यादृष्टीने केलेल्या चुकीसाठी त्यांनी शिक्षा देण्याची तयारी भाजपने चालवली आहे. सेनेचे 40 आमदार फोडण्यात सक्रिय सहभाग घेऊन भाजपने तसे पाऊलही टाकले आहे. तरीही पुन्हा ठाकरे हे भाजपच्या दारात जातील, अशी शक्यता अजिबातच नाही.

भाजप आणि सेना बंडखोर हे काय पावले उचलणार, यावर ठाकरे यांचे नियोजन असेल असे दिसते आहे. ते सर्वोच्च न्यायालयातील 11 तारखेच्या सुनावणीपर्यंत सरकार वाचविण्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतील. स्वतःहून राजीनामा देण्याची शक्यता कमी आहे. विधानसभेतील संभाव्य अविश्वास ठरावाच्या वेळी ठाकरे हे भाजप आणि अपक्षांना आपल्या भाषणातून चोख उत्तर देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानिमित्ताने जनतेची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.

त्यांनी आज दोन पावले पुढे येत बंडखोरी केलेल्या आमदारांना माघारी परतण्याचे आवाहन केले. ‘अजूनही वेळ गेलेली नाही. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका’ असा सल्लाही कुटुंबप्रमुख म्हणून देत असल्याचे ठाकरे म्हणाले. एकूणच माझी समेटाची तयारी होती पण बंडखोरांनी ती ऐकली नाही, असेच त्यांना आता दाखवून द्यायचे असेल.

ठाकरे यांना अजूनही फुटीर आमदारांतील काही जण पुन्हा आपल्याकडे येतील, असा विश्वास वाटतो आहे. किमान शिंदे यांना सेना आमदारांच्या एकूण संख्येपैकी दोन तृतीयांश (38) आमदार मिळू नयेत, असा त्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळे अजूनही ठाकरे फायटिंगच्या तयारीत आहेत. त्यांचे सरकार जाण्याची चिन्हे आहेत पण भाजपला शरण जाणार असल्याची शक्यता फारच दुर्मिळ आहे. त्यामुळे पुनश्च हरि ओम करण्याशिवाय ठाकरेंकडे पर्याय नसेल. तरी ते ठाकरे आहेत, विसरायचे कारण नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT