विश्लेषण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बच्चू कडूंना मंत्री करणार ?

सरकारनामा ब्युरो

पुणे : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने मांडत आहेत. भाजप सरकारमध्ये असतानाही ते याच भूमिकेवर ठाम होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कर्जमाफी शिवसेनेच्या कधी पचनी पडली नाही.

शिवसेनेच्या मंडळींना शेतीतले काय कळते असा आरोपही त्यांच्यावर होत असतो. राज्यातील शेती उध्वस्त होत असताना शेतकऱ्यांना पुन्हा संकटातून बाहेर काढण्यासाठी ठाकरे सरकारने कंबर कसली आहे. 

शेतकरी देशोधडीला लागला असताना त्यांच्या मदतीला प्रत्येक पक्ष धावून जात होता. त्यामध्ये शिवसेनाही आघाडीवर होती. हे सर्व खरे असले तरी शेती प्रश्‍नाची जाण असलेला एकही नेता आजतरी शिवसेनेकडे नाही. शेती, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूरांविषयी तळमळ आणि अभ्यास असलेल्या नेत्यांच्या शोधात शिवसेना विशेषत: उद्धव ठाकरे होते. राज्यातील सत्ता समीकरण बदलताच उद्धव यांनी शेतकऱ्यांसाठी नेहमीच रस्त्यावर लढाई करणारे फायरब्रॅंड नेते बच्च कडूंना आपल्याकडे खेचले. 

शिवसेनेला ज्या ज्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे त्यामध्ये बच्चू कडूंचा पक्षही आहे. या पक्षाचे दोन आमदार आहे. आज ते भक्कमपणे उद्धव यांच्या बाजूने उभे आहेत. वास्तविक सरकार कोणाचेही असो आमदार कडू हे नेहमी शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन सरकारवर आसूड ओढतात. काहीसे आक्रमक असलेले आणि प्रसंगी कायदा हातात घेतानाच कोणाचीही भिड ना भाड ठेवणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कडू ज्या पद्धतीचे आंदोलन करतात तेच शिवसेना गेली पन्नास वर्षे करीत आहेत. मराठी माणसावरील अन्याय असो की भूमिपुत्रांचा प्रश्‍न असो शिवसेनेही हजारदा कायदा हातात घेतला आहे. 

जन आंदोलने केली आहेत. त्याचे परिणाम काय होतील हे कधी पाहिले नाही. जर मागून न्याय मिळत नसेल दंडेलशाही करण्यास शिवसेनेने पाहिले नाही. शिवसेना असो की बच्चू कडू. जनतेच्या न्याय हक्कासाठी लढताना तुरूंगात जाण्याचाही कधी विचार केला नाही.

त्यामुळेच की आमदार कडू म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. त्यांचे विधानसभेतील भाषण असो की रस्त्यावरील त्यांच्या मुखात पहिला शब्द असतो शेतकरी. शेतकऱ्यांविषयी प्रचंड तळमळ असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे आणि दुसरे राजू शेट्टी यांच्याकडे पाहिले जाते. 

आमदार कडूंना बरोबर घेऊन शिवसेना राज्याला वेगळा संदेश देऊ इच्छिते. त्यामुळे आमदार कडू मंत्री कडू झाले तर आश्‍चर्य वाटायला नको. शेतकऱ्यांचा बुलंद आवाज बच्चू कडू हे मंत्री होणार असल्याचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. विधानसभेचे अध्यक्ष निवडले गेले की मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळेल याची उत्सुकता आहे.

कोणती खाती कोणत्या पक्षाला हे ही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे कृषिमंत्री कोणाला मिळणार हेही एकदोन दिवसात कळेल. काही झाले तरी आमदार बच्चू कडूंना उद्धव ठाकरे मंत्री करतील अशी आशा महाराष्ट्रातील शेतकरी करीत असतील तर ते योग्यच आहे असे म्हणावे लागेल. त्यांना मंत्री करायचे की नाही याचा संपूर्ण अधिकार मात्र मुख्यमंत्र्याच्या हातात आहे ! 
 

 
 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT