विश्लेषण

सुपरमॅन' जेटली यांच्यावर यशवंत सिन्हांचा "हल्ला बोल' 

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या दरातील घसरणीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा मिळायला हवा होता. मात्र स्वतःला सुपरमॅन समजणारे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या काळात देशाची अर्थव्यवस्था घसरणीला लागली आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे. 

"इंडियन एक्‍स्प्रेस'मधील एका लेखात सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेटली यांच्यावर शेलक्‍या शब्दांत टीका केली. 
""आपण गरीबीत दिवस काढले आहेत असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. मोदींच्या अर्थमंत्र्यांमुळे मात्र देशातील जनतेला लवकरच जवळून गरीबी पहावी लागेल असे दिसत आहे. मंदीच्या काळात नोटाबंदी करून मोदी सरकारने आगीत तेल ओतले,' असे त्यांनी म्हटले आहे. 


"देशाच्या अर्थव्यवस्थेची जेटली यांनी जी अवस्था करून ठेवलीय, त्यावर मी आता बोललो नाही तर ते माझ्या देशाशी प्रतारणा केल्यासारखे होईल. परंतु, मी जे बोलतोय त्याच्याशी भाजपमधील अनेक नेते सहमत होतील, हे मला माहिती आहे. भीतीमुळे ते नेते बोलत नाहीत. खासगी गुंतवणुकीत जितकी घसरण झालीय, तितकी गेल्या दोन दशकात झालेली नाही. औद्योगिक उत्पन्नाची स्थिती बिकट आहे, कृषी क्षेत्रातही समस्या वाढल्यात. रोजगार उपलब्ध करणारे उद्योगधंदेही संकटात आहेत. नोटाबंदी पूर्णपणे अयशस्वी झाली आहे. त्याचवेळी, जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भयावह स्थिती आहे. लाखो लोक बेरोजगार होत आहे, असं सिन्हा यांनी या लेखात नमूद केले आहे. 

सिन्हा यांनी भाजप सरकारलाच कानपिचक्‍या दिल्यामुळे पक्षामध्ये एकच खळबळ माजली आहे. आपण गरीबी अत्यंत जवळून पाहिलीय, सोसलीय असा दावा पंतप्रधान मोदी करतात. त्यामुळे कदाचित देशातील प्रत्येक नागरिकाने गरीबी जवळून पाहावी, यासाठी त्यांचे अर्थमंत्री दिवस-रात्र मेहनत करत आहेत, असा टोला सिन्हा यांनी अरुण जेटली यांना लगावलाय. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT