व्यक्ती विशेष

काँग्रेसमधील पडझड रोखण्यासाठीच मुकुल वासनिक ? 

सरकारनामा ब्युरो

नागपूर : सर्वात जुना राष्ट्रीय राजकीय पक्ष कॉंग्रेसची सध्या देशभरात पडझड सुरु आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अध्यक्षपदासाठी अनुभवी ज्येष्ठ नेत्यांसह काही तरुणतुर्क नेत्यांचीही नावे पुढे आली. पण आता नेतृत्व करणार कोण या प्रश्‍नाचं उत्तर मुकुल वासनिक यांच्या रुपात कॉंग्रेस शोधू पाहात आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि तरुण फळी यांचा सुवर्णमध्य वासनिक साधू शकतात, असे पक्षाला वाटत आहे. 

मुकुल वासनिक दिल्लीत महाराष्ट्राचा दलित चेहरा म्हणून ओळखला जातात, असे सांगितले जाते. महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यापासून दलित समाज कॉंग्रेसपासून दुरावल्याचे चित्र बघावयास मिळते. पण प्रत्यक्षात तसे चित्र नसल्याचे या समाजातील जाणत्यांकडून सांगण्यात येते. दलित जो कॉंग्रेसपासून दुरावला तो आज, आत्ता किंवा लोकसभा निवडणुकीपासून नव्हे तर गेल्या 15 ते 20 वर्षांपासून हा समाज कॉंग्रेसपासून दुरावण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याला कारण समाजाप्रती कॉंग्रेसची चुकीची धोरण सांगितली जातात. कॉंग्रेसने वासनिकांनी केवळ दलित चेहरा म्हणून पुढे करण्यापेक्षा राष्ट्रीय नेतृत्व म्हणून समोर आणणेच कॉंग्रेससाठी फायद्याचे ठरणार आहे. 

2009 ते 2014 विदर्भाच्या नागपूर जिल्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मुकुल वासनिकांनी केले आहे. या कार्यकाळात त्यांनी रामटेक किंवा विदर्भावर आपल्या कामाची एकही छाप सोडली नसल्याचे रामटेकवासी सांगतात. कन्हानच्या पुलाव्यतिरीक्त दुसरे कुठलेही काम हाती घेतल्याचे रामटेकवासींना आठवत नाही. आजही या पुलाचे काम अर्धवट स्थितीतच अडकले आहे. विदर्भात वासनिक हे नाव फारसे ओळखले जात नाही. हीच स्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत वासनिक पक्षासाठी काही करीश्‍मा करतील, याची शक्‍यता कमीच असल्याचे बोलले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT