अभ्यासू आमदार म्हणून ज्यांनी विधानसभेत आपली प्रतिमा निर्माण केली होती, असे पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आप्पासाहेब राजळे (वय 48) यांचे ह्रदयविकाराने मुंबईत निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून किडनी व पोटाच्या विकाराने त्यांच्यावर मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव राजळे हे भारतीय जनता पक्षाच्या आमदार मोनिका राजळे यांचे पती, कॉगेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे होत.
जिल्ह्याच्या राजकारणात कमी वयाचा अभ्यासू आमदार म्हणून माजी आमदार राजीव राजळे यांची ख्याती होती. राजाभाऊ या नावाने ते प्रसिद्ध होते. राजळे याचे शिक्षण प्रवरा पब्लिक स्कुलमध्ये झाले. पुण्यातील भारती विद्यापीठात त्यांनी आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले. पण या क्षेत्रात ते रमले नाहीत. 1999 मध्ये त्यांनी राजकारणात उडी घेतली. राजकारणी असलेले वडिल अप्पासाहेब राजळे, कृषिमंत्री असलेले मामा बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. राजकारणात उडी घेतल्यानंतर पहिल्या तीन महिन्यातच कॉग्रेसमधून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. मात्र ती जिंकता आली नाही. अवघ्या 824 मतांनी त्यावेळी भाजपचे दगडू बडे यांच्याकडून हार मानावी लागली. अपयश आले असले, तरी राजळे यांनी माघार घेतली नाही. उलट आपण कुठे कमी पडलो, याचे आत्मपरीक्षण करीत जोमाने कामाला लागले. पुढील विधानसभा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा चंगच बांधला. अगदी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली. युवक कॉग्रेसच्या माध्यमातून त्यांनी जुळवाजुळव सुरू केली. त्यावेळी कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते. विजेच्या प्रश्नावर त्यांनी एक लढा - एक धडा हे आंदोलन आक्रमक पद्धतीने उभारले. सुमारे दहा हजार युवकांच्या मोर्चाने पाथर्डी तहसील कार्यालय दणाणले. स्वपक्षाच्या सरकारविरोधातच भूमिका घेऊन अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतले.
पाच वर्षात जोरदार तयारी करीत राजाभाऊ यांनी 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा दंड थोपटले. भाजपचे आमदार ऍड. प्रताप ढाकणे यांचा तब्बल सहा हजार मतांनी पराभव करीत राजळे विजयी झाले. 2004 ते 2009 या पाच वर्षाच्या काळात त्यांनी विविध प्रश्नांना हात घातला. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. राज्याचा जमा-खर्च व नियोजनासारख्या आकडेमोडीच्या व जड विषयावर चर्चा सुरू असताना राजळे यांनी अर्थसंकल्पावर तडाखेबंद भाषण केले. त्यावेळी संपूर्ण सभागृह अवाक झाले. विकासाचा अनुशेष, शेतकऱ्यांची अवस्था, सावकारशाहीचा फास, ग्रामीण भागातील समस्या आदी मुद्दे त्यांनी भाषणातून मांडले. तब्बल सव्वा तास चाललेल्या या भाषणानंतर पहिली टाळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी वाजविली. त्यापाठोपाठ टाळ्यांचा पाऊसच सुरू झाला. राजकारणात अशी लक्षवेधी एन्ट्री झालेले आमदार म्हणून राजळे यांची ख्याती निर्माण झाली.
मुंबईमध्ये तरुण आमदारांचा फोरम तयार करून संसदीय कामकाज, लोकप्रतिनिधींची कार्यपद्धती, सभागृहातील प्रशासकीय कामकाज, कार्यकर्त्यांची बांधणी यावर राजळे यांनी अभ्यास केला. त्यामळे राज्यातील अनेक आमदार त्यांच्याकडून राजकीय अडीअडचणी सोडविण्यासाठी सल्ला घेत.
आमदार असताना त्यांनी लहान-मोठ्या कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झाले. लग्न, साखरपुडा, हरिणाम सप्ताह, स्नेहभोजन, जत्रा, धार्मिक उपक्रम, अंत्यविधी, दशक्रीया विधी अशा सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांनी प्रत्येकाशी स्नेहबंध अधिक वाढविला. देखरेख संघ, खरेदी-विक्री संघ, तालुका दूध संघ, साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी संस्थावर त्यांनी वर्चस्व मिळविले.
राजळे यांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून काम पाहिले. पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. जलसंधारण विभागाच्या नियोजन समितीमध्ये ते सदस्य होते. वांबोरी चारीसाठी निधी मिळविण्यासाठी थेट राज्यपालांकडे जाऊन तसेच मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून तीस लाखांचा निधी त्यांनी त्यावेळी उपलब्ध केला होता. मिरी-तिसगाव पाणी योजना, हातगावसह बारा गावांची बोधेगावची पाणी योजना आदी योजना मार्गी लावल्या. हातात झाडू घेऊन जिल्हापरिषदेत स्वच्छता करणारे ते पहिलेच आमदार आहेत.
राजळे यांनी राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे ऑस्ट्रेलिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, नेदरलॅंड, बेल्जियम, इंग्लड आदी देशांचा दौरा केला. कृषी, संस्कृती, काव्य, लेखन, तांत्रिक ज्ञान, संगणक, इंटरनेट आदी क्षेत्रांत त्यांचे अभ्यास होता. वाचनाची प्रचंड आवड, नियमित व्यायाम, शास्त्रीय संगीत ऐकणे, अधूनमधून चित्रपट पाहणे आदी छंद त्यांनी जोपासले. लोकप्रतिनिधी ही गोष्ट मिरविण्यासाठी नव्हे, तर जनतेला सावरण्यासाठी या पदाचा उपयोग व्हावा, अशी त्यांची धारणा होती. राजळे यांचा पाथर्डीत जनता दरबार भरायचा. जनतेचे प्रश्न समजावून घेत लगेचच अधिकाऱ्यांना फोन करून प्रश्न मार्गी लावले जात होते. गाडीमध्ये पुस्तकांचे भांडार असायचे. नियमित वाचन असल्याने कोणत्याही विषयांवर बोलण्याची त्यांची केव्हाही तयारी असायची. पंढरपूरच्या मंदिरात परराज्यातील एका वृद्ध महिलेला पांडुरंगाचे दर्शन मिळणे अवघड झाल्याने राजळे यांनी संबंधीतांना धारेवर धरून उपस्थितांकडून वाहवा मिळविली होती.
2009 मधील विधानसभेच्या निवडणुकीत राजळे अपक्ष उभे राहिले. राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला गेली. त्यावेळी चंद्रशेखर घुले यांनी राजळे यांचा पराभव केला. त्यानंतर पुढे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पत्नी मोनिका राजळे यांना भाजपकडून उमेदवारी मिळवून त्यांना विजयी करण्यासाठी राजीव राजळे यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. या मतदार संघात विविध कामे करण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांना त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. राजीव राजळे यांच्या निधनाने या मतदार संघातील एक अभ्यासू व्यक्तीमत्त्व हरपले आहे त्याचबरोबर जिल्ह्याच्या राजकारणातील एक अष्टपैलू नेतृत्त्व, युवकांचा मार्गदर्शक हरपला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.