Ganpatrao Desshmukh Biography Will be Published Soon
Ganpatrao Desshmukh Biography Will be Published Soon 
व्यक्ती विशेष

गणपतराव देशमुख यांचे चरित्र प्रकाशित होणार

संपत मोरे

पुणे : सांगोला मतदारसंघाचे सलग अकरा वेळा प्रतिनिधित्व केलेल्या आणि राज्याच्या राजकारणात एक आदर्श नेता म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चरित्र प्रकाशित होत आहे. आजवर त्यांचे चरित्र लिहावे म्हणून अनेकांनी प्रयत्न केले पण खुद्द आबांनीच त्याला नकार दिला होता पण आता प्राचार्य डॉ कृष्णा इंगोले यांनी आबांचे चरित्र लिहिले आहे.

आजच्या काळातील सर्वात ज्येष्ठ, अनुभवी, बुजुर्ग, तत्त्वनिष्ठ, चारित्र्यसंपन्न, आदर्श नेतृत्व म्हणजे सांगोल्याचे माजी आमदार गणपतरावजी देशमुख होत. 'सांगोला' या एकाच मतदार संघातून सत्तेच्या विरोधी शेकापच्यावतीने अकरा वेळा निवडून येऊन त्यांनी एकावन्न वर्षे विधानसभा सदस्य म्हणून काम करून देशात विक्रम प्रस्थापित केला आहे. गेली बासष्ट वर्षे ते सार्वजनिक जीवनात शेतकरी, कष्टकरी, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे आयडॉल नेते ठरले आहेत. त्यांचे जीवनकार्य हे नेहमी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असे आहे.

राजकारणात प्रतिमा निर्माण करायला व्रतस्थपणाचं मूल्य सांभाळावं लागतं. तेही आयुष्यभर सांभाळायचं म्हणजे डोंगर उचलण्यासारखी गोष्ट आहे. असा नैतिकमूल्यांचा डोंगर उचलण्याचं काम व्रतस्थपणानं  गणपतराव देशमुख यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांच्या उभ्या आयुष्याकडे समाजशास्त्राच्या दृष्टीने पाहावे लागेल. शोधक वृत्तीने त्यांचे चरित्र समजावून घ्यावे लागेल. आदर्श उदाहरणं बोटावर मोजण्याइतकीच असतात. अशा आदर्शांकडे पाहणे म्हणजेसुद्धा आपली उंची अधिक वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण बाब असते. 

''माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणार्‍या माणसांचा नेता म्हणून 'आबासाहेब' अस्सल देशीपणाचे सत्त्व घेऊन उभे राहिले. आबांचे चरित्र महाराष्ट्राच्यापुढे येणे आवश्यक होते ते काम आम्ही केले आहे. शब्दशिवार प्रकाशनाने हे चरित्र प्रकाशित केले असून आबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना पुस्तक भेट देत आहोत."असे प्रकाशक इंद्रजित घुले यांनी सांगितले.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT