Pawar_And_Thakare. 
वहिनी साहेब

राज ठाकरे -  अजित पवारांचे राजकीय  वैर 'गृह'मंत्र्यांच्या मैत्रीपुढे  हरले ! 

मिलिंद संगई : Sarkarnama

बारामती :  महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार आणि राज ठाकरे ही दोन टोके आहेत. परस्परांवर तडाखून टीका करण्याची संधी दोघेही सोडत नाहीत. परस्परांवर जोरदार हल्ले चढविणाऱ्या ठाकरे-पवारांच्या संघर्षातही मैत्रीचे नाते जपले गेले ते दोघांच्या गृहमंत्र्यांमुळे! 

राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष सर्वांना माहीत असला तरी सौ. सुनेत्रा पवार आणि सौ. शर्मिला ठाकरे यांच्यातील मैत्रीची वीण किती घट्ट आहे याची प्रचिती एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना आली. 

सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या कार्याची नोंद घेणाऱ्या 'दीपज्योती ... एक प्रकाश पर्व' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते धनंजय मुंडे. पण टाळ्यांचा खरा कडकडाट झाला तो सौ. शर्मिला राज ठाकरे व्यासपीठावर आल्यानंतर!

शर्मिला ठाकरे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नव्हते. पण मैत्रीपुढे औपचारिकता महत्त्वाची नसते हे दाखवून देत शर्मिला ठाकरे आल्याही आणि बोलल्याही. 

" मला माझ्या नवऱ्यासारखे छान बोलता येत नाही,'' असे म्हणत शर्मिला ठाकरे यांनी टाळ्या घेतल्या. आपल्या भाषणात त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी असलेल्या मैत्रीचे अनेक पैलू श्रोत्यांसमोर उलगडले.

त्या म्हणाल्या, " सुनेत्रा पवार माझी मैत्रीण आहे. आम्ही मुंबईत वरचेवर भेटत असतो. खरं तर ती असे काही सामाजिक काम करीत असेल याची मला कल्पना नव्हती. काका (शरद पवार) आणि दादा (अजित पवार) आहेत म्हटल्यावर हिला काही करण्याची गरज आहे असे मला वाटलेच नव्हते.'' 

"पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिच्या कामाची ध्वनिचित्रफीत पाहिल्यानंतर मला उत्सुकता लागली आहे. मलाही आता बारामतीला जाऊन तिचे काम पाहण्याची मनापासून इच्छा आहे. आता आम्हा सर्व मैत्रिणींना बारामतीला घेऊन जावे आणि आपले काम दाखवावे.'' 

"खरे तर मुंबईतही पर्यावरणाची समस्या खूप गंभीर आहे. सुनेत्राने जर मुंबईत असे काम सुरू केले तर पक्षीय भेद बाजूला ठेवून मी या कामात मदत करीन.'' अशी ग्वाही शर्मिला ठाकरे यांनी दिली. 

प्रकाशन सोहळ्यानंतर जमलेल्या श्रोत्यांमध्ये चर्चा रंगली ती ठाकरे-पवार घराण्यात राजकीय युद्धातही मैत्रीचे नाते जपण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या दुसऱ्या पिढीच्या गृहमंत्र्यांची. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT