महापालिकेचा कचरा आमच्याकडे आणि मलाई तुमच्याकडे का ? कल्याण काळेंचा खैरेंना टोला

पण प्रकल्प तर उभारू देणार नाहीच, शिवाय पुन्हा महापालिकेचा कचरा गावात आणू देणार नाही या भूमिकेवर आंदोलक ठाम राहिले.
महापालिकेचा कचरा आमच्याकडे आणि मलाई तुमच्याकडे का ? कल्याण काळेंचा खैरेंना टोला

औरंगाबाद :  महापालिकेच्या वतीने नारेगाव येथे टाकण्यात येणार कचरा रोखत गावकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाच्या स्थळी जमलेल्या राजकीय नेत्यांमध्ये कलगितुरा रंगला.  गावकऱ्यांनी उभारलेल्या आंदोलनाच्या आठव्या दिवशीही तोडगा निघाला नाही.गावकऱ्यांचे मन वळविण्यासाठी गेलेल्या पालकमंत्री दीपक सावंत यांना  देखील कचऱ्याची पाहणी करून  रिकाम्या हातानेच परतावे लागले.

आंदोलनस्थळी सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी जमले होते. भाजपचे आमदार अतुल सावे वगळता ज्यांच्या मतदारसंघात हा भाग येतो ते विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, व खासदार रावसाहेब दानवे आंदोलनाकडे फिरकले नाहीत. काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांनी यावेळी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर हा भाग तुमच्या मतदारसंघात नसल्यानेच तुम्ही इकडे फिरकला नव्हतात असा आरोप केला.

तसेच महापालिकेचा कचरा आमच्याकडे आणि मलाई तुमच्याकडे का? असा टोला लगावला. भाजपचे महापौर होते तेव्हा नाना ( हरिभाऊ बागडे ) मध्यस्थी करायला आले होते, आता शिवसेनेचा महापौर आहे म्हणून खैरे साहेब तुम्ही आलात, असा आरोप देखील कल्याण काळे यांनी केला. अब्दुल सत्तार यांनी नरेगावच्या ग्रामस्थांना तुमच्यावर अन्याय झाला हे खरे आहे, पण यातून समन्वयाने मार्ग काढण्याची विनंती केली पण आंदोलकांनी त्याला देखील प्रतिसाद दिला नाही.

खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, महापालिका आयुक्त मुगळीकर यांनी करण्यात येणाऱ्या उपाय योजना व त्यासाठी लागणारा कालावधी याची माहिती देत मुदत देण्याची मागणी केली. आमदार संजय सिरसाट, अतुल सावे, सुभाष झांबड यांनी मात्र काही न बोलणेच पसंत केले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्‍नवार लक्ष घालत पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांना शुक्रवारी (ता. 23) आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पाठवले होते. कचऱ्यावर प्रक्रिया करून तो हटवण्यासाठी आणखी काही महिन्यांची मुदत द्या अशी विनंती डॉ. दिपक सांवत यांनी नारेगाववासियांना केली. पण नवीन कचरा येऊ देणार नाही, आहे तो कचरा उचलण्यासाठी पाहिजे ती मुदत द्यायला तयार असल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने पालकमंत्र्यांनी देखील रिकाम्या हातानेच परतावे लागले.

नारेगाव येथील कचरा डेपोचा प्रश्‍न चिघळला आहे. ऑक्‍टोबर 2017 मध्ये महापालिका प्रशासनाला दिलेली चार महिन्याच्या मुदतीत काहीच घडले नाही. त्यामुळे ग्रामस्थ आता महापालिकेवर विश्‍वास ठेवायला तयार नाही. मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आज पालकमंत्री सांयकाळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय सिरसाट, अतुल सावे, अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले, महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासह आंदोलनस्थळी आले.

गावकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यावर पालकमंत्र्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करून तो नष्ट करण्याचा प्रकल्प उभारणे आणि कचरा टाकण्यासाठी नवी जागा शोधण्यासाठी काही महिन्याची मुदत देण्याची विनंती केली. पण प्रकल्प तर उभारू देणार नाहीच, शिवाय पुन्हा महापालिकेचा कचरा गावात आणू देणार नाही या भूमिकेवर आंदोलक ठाम राहिले. सध्या असलेला कचरा हटवण्यासाठी किती मुदत पाहिजे तेवढे बोला असे म्हणत आक्रमक भूमिका घेतली.

काहीच तोडगा निघत नाही हे पाहून पालकमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांचा मंडप सोडून कचरा डेपोकडे जाऊन पाहणी केली आणि तिथूनच ते गाडीत बसून विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठकीसाठी निघून गेले. त्यानंतर माजी आमदार कल्याण काळे यांच्या उपस्थितीत आंदोलनस्थळी झालेल्या चर्चेत विभागीय आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या बैठकीला न जाण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेली कचराकोंडी कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com