पुन्हा आमदारकीसाठी नितीन पाटलांना रामकृष्ण बाबांचा कानमंत्र?

Ramkrishna Baba Patil - Nitin Patil
Ramkrishna Baba Patil - Nitin Patil

औरंगाबाद  :  कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले कॉंग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील यांनी नुकताच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्याकडून कानमंत्र घेतल्याची जोरदार चर्चा आहे. 

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचे नितीन पाटील चिरंजीव आहेत . 2000 मध्ये झालेल्या कन्नड विधानसभा निवडणुकीत नितीन पाटील कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून  आले होते. परंतु 2005 मध्ये शिवसेनेच्या नामदेव पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर नितीन पाटील यांनी पुढच्या दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाकडे उमेदवारी मागितली, पण त्यांना डावलण्यात आले. परिणामी नितीन पाटलांनी मतदारसंघात फारसा संपर्कही ठेवला नाही. 

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची नितीन पाटील यांची इच्छा आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या विविध कार्यक्रम आणि आंदोलनात ते सक्रीय सहभाग घेतांना दिसतात. पण यावेळीही त्यांच्या मार्गात विद्यमान शिवेसना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या रुपाने अडथळा निर्माण झाला होता. पण त्यांच्या घरवापसीमुळे नितीन पाटील यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. 

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार जिल्हा बॅंकेचे संचालक आहेत. बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील व त्यांचे पुत्र नितीन पाटील यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे कन्नडमधून नितीन पाटील यांना उमेदवारी मिळण्यास अडचण येणार नाही अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. शिवाय जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून सत्तार यांना देखील निवडणुकीत वेळोवेळी मदत होते याची जाण देखील सत्तार ठेवतील असे वाटते. 

परंतु कन्नड मतदारसंघात कॉंग्रेसकडून वारंवार प्रयोग केला जातो. इतर पक्षातील ताकदवान पदाधिकारी, आमदारांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची प्रथा गेल्या दोन-तीन निवडणुकांपासून कन्नडमध्ये सुरु आहे. अशात आपला पत्ता कट होऊ नये यासाठी नितीन पाटलांनी रामकृष्ण बाबांचा सल्ला घेतल्याचे बोलले जाते. रामकृष्ण बाबा जिल्हा बँकेचे चेअरमन असताना नितीन पाटील व्हाईस चेअरमन होते . 

बाबांचे कॉंग्रेसमध्ये अजूनही वजन 
 
रामकृष्ण बाबा पाटील हे राजकारणात सक्रीय नसले तरी त्यांचे कॉंग्रेसमध्ये अजूनही वजन कायम आहे. काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या आणि हायकमांड श्रीमती सोनिया गांधी  यांच्याशी रामकृष्णबाबांची थेट ओळख आहे . 78-80 मध्ये पंचायत समिती सभापती पदापासून बाबांच्या राजकारणाला सुरुवात झाली. पुढे 85 ते 95 दरम्यान, वैजापूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून  आले होते . राज्याच्या राजकारणानंतर 1998 मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांचा पराभव करत विजय मिळवला होता . 

केंद्रात असतांना त्यांनी कृषी व अर्थ विषयक समित्यांवर सदस्य म्हणून काम केले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष देखील होते. दहावी पास असलेल्या बाबांचे शेती विषयातील ज्ञान आणि अनुभव मोठा होता. त्यामुळे 1994 अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे जाऊन त्यांनी शेती तंत्रज्ञानातील बदल जाणून घेतले होते. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी थेट संपर्क साधणारे नेते म्हणून बाबांची ओळख होती. या शिवाय महाराष्ट्रातील सगळ्याच कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्र्यांशी बाबांचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. 

वैजापूरात नुकत्याच झालेल्या कॉंग्रेसच्या आक्रोश मोर्चात बाबांनी व्यासपीठावर हजेरी लावून आपल्या ताकदीचा परिचय आजच्या कॉंग्रेस पुढाऱ्यांना करून दिला होता. मला कॉंग्रेस पक्षातून कोणीच काढू शकत नाही, अगदी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार सुध्दा असे सांगत त्यांनी सूचक इशारा दिला होता. बाबांची ही ताकद आणि सुरेश पाटील व नितीन पाटील यांच्यांशी असलेले नाते संबंध पाहता कन्नड विधानसभेच्या उमेदवारीसाठी बांबाचा आर्शिवाद डोक्‍यावर असावा यासाठीच नितीन पाटलांनी प्रयत्न सुरु केले असल्याचे दिसते. 

   जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील व रामकृष्ण बाबा पाटील हे एकमेकांचे नातेवाईक आहेत . सुरेश पाटील यांनी दोन वेळा लोकसभा लढविलेली आहे . सुरेश पाटील व रामकृष्ण बाबा पाटील यांच्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेतृत्वावरून मतभेद झाले होते .

पण काळाच्या ओघात दोहेही जुने मतभेद विसरून एकत्र कामाला लागले आहेत . काँग्रेस पक्षाच्या सहकारातून पुढे आलेल्या नेत्यांच्या फळीतील हे दोघे आता अखेरचे शिलेदार आहेत .  एकेकाळी यादोघान्ची जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड होती . पण आता दोघेही जिह्याच्या राजकारणात बाजूला पडलेले नेते आहेत . या दोघांचेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत .

एव्हडेच नव्हेतर या दोघांचे काई. शंकरराव चव्हाण यांच्याशीदेखील जवळचे संबंध होते . आज आमदार अब्दुल सत्तार अशोक चव्हाणांच्या अतिशय जवळ असले तरी सत्तार  अशोकरावांच्या जवळ  गेले ते दादा आणि बाबांच्या ओळखीतूनच . हे सर्व जुने ऋणानुबंध पाहता   नितीन पाटील यांना आगामी विधानसभेत कन्नडमधून कॉंग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्‍यता बळावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com