वसमतची जागा शिवसेनेची की भाजपची ?  

.
Wasmat
Wasmat

हिंगोली :  वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपसह शिवसेनेच्‍या इच्‍छुक उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला असून युती झाल्‍यास उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत संभ्रमाचे वातावरण कायम आहे. वसमतची जागा खरे तर शिवसेनेची आहे पण या जागेसाठी भाजपने जोर लावला आहे असे दिसते .   

वसमत विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने स्‍वबळावर निवडणूक लढवली. त्‍यातच भाजप नेते  शिवाजी जाधव यांनी अपक्ष म्‍हणून निवडणूक लढवल्‍याने या निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती. या लढतीमध्ये शिवसेनेचे डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी बाजी मारली.

दरम्‍यान, यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी मागील काही दिवसांपासून गावोगाव भेटी देवून प्रचाराला सुरुवात केली. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी निश्चित होवून वसमतची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी सभापती राजू नवघरे हे इच्‍छुक आहेत. पक्षाच्‍या वरिष्ठ नेत्‍यांकडून ऐनवेळी कोणाच्‍या नावाला पसंती दिली जाणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

दरम्‍यान, लोकसभा निवडणुकीत भाजपकडून शिवाजी  जाधव यांना निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आले होते. त्‍यानुसार त्‍यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवला होता. मात्र ऐनवेळी युती झाल्‍यामुळे तसेच हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेकडे असल्‍यामुळे भाजपचे शिवाजी जाधव यांना उमेदवारी नाकारण्यात आली. मात्र त्‍यानंतरही त्‍यांनी अपक्ष म्‍हणून उमेदवारी दाखल केली. मात्र भाजपच्‍या वरिष्ठ नेत्‍यांनी त्‍यांना सबुरीचा सल्‍ला दिल्‍याने त्‍यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

मात्र आता विधानसभा निवडणुकीत वसमतची जागा युतीमधून शिवसेनेकडे असतानाही भाजपचे ऍड .  जाधव यांनी जोरदार प्रचार चालवला आहे. गावोगावी भेटी देवून पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्‍या सूचना दिल्‍या जावू लागल्‍या आहेत.ऍड जाधव निवडणूक रिंगणात उतरणार हे निश्चित मानले जात आहे. 

दुसरीकडे शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफुस सुरु झाली आहे. सोमवारी (ता.१६) मुंबई येथे झालेल्‍या मुलाखतीमध्ये आठ इच्‍छुकांनी मुलाखती दिल्‍या आहेत. यामध्ये राजू चापके, सुनील काळे, बालाजी तांबोळी, जिल्‍हा परिषद सदस्य अंकुश आहेर, दीपक हळवे, रविराज देशमुख, राजू मुसळे, धनंजय गोरे यांचा समावेश आहे. यावरून विद्यमान आमदार डॉ. मुंदडा यांना अंतर्गत विरोध होत असल्‍याचे चित्र दिसू लागले आहे.

वसमत विधानसभेत युती झाल्‍यास वसमतची जागा भाजपला सोडण्याच्‍या हालचाली देखील सुरु झाल्‍याचे बोलले जात आहे. त्‍यामुळे सध्या तरी राजकीय वर्तुळातून संभ्रमाचे वातावरण कायम आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com