'तुमच्या पतींची लूडबुड थांबवा', जिल्हा परिषद अध्यक्षा डोणगांवकर यांच्यावर भाजप सदस्याचा हल्लाबाेल 

गंगापूरचे विद्यमान भाजप आमदार प्रशांत बंब यांनी देखील जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची परस्पर बैठक घेऊन शिवसेनेच्या कारभारावर टिका केली होती. त्याला देवयानी डोणगांवकर यांनी देखील आमदारांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांकडे लक्ष द्यावे, जिल्हा परिषद सांभाळायला आम्ही सक्षम आहोत अशा शब्दांत उत्तर दिले होते.
Dongaonkars
Dongaonkars

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत परवानगी न घेता मध्येच बोलणाऱ्या एल. जी. गायकवाड या भाजप सदस्याला जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगांवकर यांनी रोखले. तुम्ही बोलणे थांबवले नाही तर मला अधिकाराचा वापर करावा लागेल असा इशारा दिला. 

पण त्याला न जुमानता उलट गायकवाड यांनी अध्यक्षांवरच आरोप केला. "अधिकाराचा वापर करायचाच असेल तर तो तुमच्या पतींची लूडबूड रोखण्यासाठी करा'' अशा शब्दांत भाजप सदस्याने अध्यक्षांवर हल्ला चढवला. वैयक्तिक स्वरूपाची टिका झाल्याने व्यथीत झालेल्या ऍड. देवयानी डोणगांवकर यांनी मग दहा मिनिटांसाठी बैठक तहकूब केली. 

राजकारणात निवडून  आलेल्या महिला लोकप्रतिनिधांचा कारभार त्यांचे पतीच हाकतात अशी ओरड नेहमीच केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये याचा प्रत्यय पदोपदी येतो. त्यामुळे राजकारणात महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा हेतूलाच हरताळ फासला जातो अशी चर्चा देखील अधून-मधून होत असते. 

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत बुधवारी (ता. 14) यावरूनच वादंग निर्माण झाले. जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपला शिवसेना-कॉंग्रेसने एकत्र येत सत्तेपासून रोखले. तेव्हापासून ही सल मनात घेऊन भाजपचे सदस्य जिल्हा परिषदेत वावरतात. जिल्हा परिषदेचा कारभार हाकतांना भाजपकडून सहकार्य मिळत नाही असा आरोप देखील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगांवकर व शिवसेना-कॉंग्रेस सदस्यांनी केला आहे. 

सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या बैठकीत यावरून सेना-भाजप सदस्यांमध्ये अनेकदा खडांजगी देखील पहायला मिळाली. पण आजच्या अर्थसंकल्पीय बैठकीत भाजप सदस्याने थेट जिल्हा परिषद अध्यक्षांवरच हल्ला चढवल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते. 

अर्थसंकल्पीय बैठकीच्या सुरुवातीलाच निधी वाटपात भेदभाव केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने सत्ताधारी आणि विरोधी भाजप सदस्यांमध्ये गरमागरमी झाली. गदारोळ वाढल्यामुळे अध्यक्षा देवयानी डोणगांवकर यांनी दोन्ही बाजूच्या सदस्यांना खाली बसण्याच्या सूचना केल्या, तसेच परवानगी घेऊन एकावेळी एकाच सदस्याने बोलावे असे सांगितले. 

सभागृहात अनुपालनाचे वाचन सुरू असताना भाजपचे सदस्य एल. जी. गायकवाड मध्येच बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावर इतर सदस्यांनी आक्षेप घेतला तरी ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर अध्यक्षा देवयाणी डोणगांवकर यांनी हस्तक्षेप करत त्यांना बसण्यास सांगितले. यावरही ते बोलतच राहिले, तेव्हा खाली बसा, परवानगी घेतल्याशिवाय बोलू नका, नाहीतर मला अधिकाराचा वापर करावा लागेल असा इशारा अध्यक्षांनी दिला. 

यावर गायकवाड यांनी खाली न बसता देवयानी डोणगांवकर यांच्यावरच वैयक्तिक टिका केली. "अधिकाराचा वापर करायचाच असेल तर तो वापरून तुमच्या पतींची जिल्हा परिषदेतील लुडबूड कमी करा " अशी भाषा वापरली. 

सभागृहात पतीवरून वैयक्तिक स्वरूपाची टिका केल्याने देवयानी डोणगांवकर कमालीच्या नाराज झाल्या. तात्काळ बैठक तहकूब करत त्यांनी आपले दालन गाठले. एखाद्या गोष्टीत पतीचे मार्गदर्शन घेण्यात गैर काय? असा उलट सवाल करत दहा मिनिटानंतर त्यांनी पुन्हा बैठक सुरू केली आणि जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्पही मंजुर केला. 

जिल्हा परिषद निवडणुकीत ऍड. देवयानी डोणगांवकर या गंगापूर तालुक्‍याती सावंगी गटातून शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. शिवसेना-कॉंग्रेसची युती झाल्यानंतर शिवसेनेकडून देवयानी डोणगांवकर यांना अध्यक्षपद देण्यात आले. त्यांचे पती कृष्णा पाटील डोणगांवकर हे आगामी विधानसभा निवडणूक गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघातून लढवण्यास इच्छूक आहेत. 

पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यामुळे आपल्या गट व गंगापूर-खुल्ताबाद विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक विकास कामे करून त्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेतील भाजप सदस्यांना त्यांचा वावर खटकत असल्याचे बोलले जाते. 

गंगापूरचे विद्यमान भाजप आमदार प्रशांत बंब यांनी देखील जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची परस्पर बैठक घेऊन शिवसेनेच्या कारभारावर टिका केली होती. त्याला देवयानी डोणगांवकर यांनी देखील आमदारांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांकडे लक्ष द्यावे, जिल्हा परिषद सांभाळायला आम्ही सक्षम आहोत अशा शब्दांत उत्तर दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com