शिवसेनेला कन्नडमधून निसटती लीड, विधानसभेला हर्षवर्धन जाधवांचे काय होणार ?

हर्षवर्धन जाधव यांना आपल्या कन्नड मतदारसंघात आघाडी मिळविता आली नाही . कन्नड मतदारसंघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंनी साडेचार हजार मतांची लीड घेतली .
Khaire-Jadhav
Khaire-Jadhav

औरंगाबादः औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पावणेतीन लाख मते मिळवून राज्याचे लक्ष्य वेधून घेतलेले हर्षवर्धन जाधव यांना आपल्या कन्नड मतदारसंघात आघाडी मिळविता आली नाही .  कन्नड मतदारसंघात शिवसेनेच्या  चंद्रकांत खैरेंनी  साडेचार हजार मतांची लीड घेतली . 

कन्नडमधून आपण विधानसभा लढवणारच अशी घोषणा हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत होताच केली होती. कन्नडमध्ये तीन विधानसभा निवडणूक लढलेल्या जाधव यांना 2009  मध्ये  मनसेकडून  आणि  आणि  2014  मध्ये शिवसेनेकडून  आमदार म्हणून  विजय मिळाला होता. आता लोकसभा निवडणुकीत मात्र  अपक्ष म्हणून लढलेल्या हर्षवर्धन यांना  जनतेने कन्नडमध्ये लीड दिली नाही. 

कन्नडमध्ये शिवसेनेचे उदयसिंग राजपूत आणि अन्य नेत्यांनी  शिवसेनेला लीड मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली . हर्षवर्धन जाधव यांचा  जिल्हाभरात प्रभाव असताना कन्नड मध्ये त्यांना लीड मिळालेली नाही हे स्थानिक शिवसेना नेत्यांचे यशच म्हणावे लागेल . आता विधानसभेलाही शिवसेनेचे जिल्ह्यातील अनेक नेते हर्षवर्धन जाधव यांचा हिशेब चुकता करण्यासाठी उत्सुक  आहेत . पण हर्षवर्धन जाधव यांचा प्रभाव वाढलेला असून त्यांच्या मागे युवकांची मोठी फौज आहे . त्यांच्याविषयी तरुण पिढीत क्रेझ दिसून येत आहे . 

कन्नड विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना सलग पाचव्याही निवडणुकीत लीड मिळाली. अर्थात आधीच्या चार निवडणुकांच्या तुलनेत 4 हजार 614 हा आकडा अगदीच नगण्य म्हणावा लागेल. असे असले तरी संपुर्ण जिल्ह्यात शिवसेनेला कडवी झुंज देणाऱ्या जाधव यांना आपल्या मतदारसंघात मताधिक्‍य मिळवता आले नाही हे देखील वास्तव आहे. त्यामुळे जाधव यांचा विधानसभेचा प्रवास खडतर होणार असे दिसते. कन्नड मतदासंघातून चंद्रकांत खैरे यांना 73 हजार 988, जाधव यांना 69 हजार 374 तर एमआयएमचे इम्तियाज जलील यांना 34 हजार 263 मते मिळाली आहेत. 

जिल्हा परिषद निवडणुकीत पत्नी संजना जाधव यांच्या पराभवाचा बदला म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्या विरूध्द लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. स्वःत निवडून  आलो नाही तरी चालेल, पण खैरे पराभूत झाले पाहिजे हाच त्यांचा उद्देश होता असेही बोलले जाते. 

मराठा आरक्षणासाठी घेतलेली भूमिका आणि आमदारकीचा दिलेला राजीनामा या सहानुभूतीतून जाधव यांनी 2 लाख 83 हजार मतांपर्यंत मजल मारली. पण त्यांच्यासाठी दिल्ली दूरच राहिली.  आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव पुन्हा नशिब आजमावणार आहेत. 

अपक्ष, मनसे, शिवसेना आणि पुन्हा अपक्ष अशी वाटचाल करणारे हर्षवर्धन जाधव विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोणती भूमिका घेतात? कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव आपल्याच कन्नड-सोयगांव मतदारसंघातून मागे पडल्याचे देखील मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 

 हर्षवर्धन जाधव यांनी मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या सोबत जावे असा सल्ला का दिला याचीही चर्चा  आहे. कन्नड विधानसभा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आहे. शिवसेनेची दारे हर्षवर्धन यांच्यासाठी आता बंद आहेत . भाजपमध्ये जाऊन उपयोग नाही कारण भाजपला ही  जागा सुटू शकत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हर्षवर्धन यांचे आधीचे पक्ष शिस्तीचे रेकॉर्ड पाहता सहज सहजी प्रवेशाची संधी नाही . त्यामुळे हर्षवर्धन वंचितचा पाठिंबा मिळावा यासाठी तर अशी विधाने करीत नाहीत ना याबाबत चर्चा आहे .  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com